कारंजा तालुका ‘पूर्ण दुष्काळग्रस्त’ घोषित

खासदार अमर काळे यांच्या आंदोलनाला यश

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

कारंजा : खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली १ ऑक्टोबर रोजी नारा टी-पॉइंट येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलनाची शासनाने दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय (उ) जारी करून कारंजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे.

कमी पाऊस, पिकांचे नुकसान आणि उत्पादनातील घट यामुळे तालुक्‍यातील शेतकरी संकटात होते. संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, कर्जमाफी व दुष्काळी मदत द्यावी, या मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना महसूल व शेतसारा माफी, कर्ज पुनर्गठन, वसुलीस स्थगिती, पाणीपट्टी व बीज बिलात सवलत तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांसारख्या सवलतींचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगण्यात आले.

‘हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आहे. दुष्काळी मदत आणि कर्जमाफी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील,’ अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *