वर्धा जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास मनाय

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वर्धा : वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी पूर्णवेळ हजर राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारण, पीक पाहणी, कर्ज पुनर्गठन आणि शेतकरी सहाय्याची कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महसूल, कृषी, आमविकास, नगरविकास, भूमी अभिलेख, महावितरण, पशुसंवर्धन, जलसंपदा, शिक्षण, पुरवठा, सहकार आणि पाणीपुरवठा आदी विभागातील जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या रजेच्या मंजुरीचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे राखीव ठेवण्यात आले आहेत. रजेचा अर्ज सबळ कारणांसह संबंधित विभागप्रमुखांच्या अभिप्रायासह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील. पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला रजेवर जाता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यालय सोडणे, परस्पर रजा मंजूर करून घेणे किंवा विनापरवानगी गैरहजर राहणे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार विभागीय चौकशी व निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत लागू तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदार कारवाईही करण्यात येऊ शकते. या आदेशाスの सर्व जिल्हास्तरीय व क्षेत्रीय विभागप्रमुखांनी गांभीर्याने नोंद घेऊन तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *