जिल्ह्यात बोरवेल व विहिरींच्या नवीन खोडकामावर तातडीची बंदी

जिल्हाधिकारी वानमथी सी यांचे आदेश; शासकीय पाणीपुरवठा कामांना नियमानुसार अपवाद

 वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील भूजलसाठ्याचे संवर्धन, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील अतिरिक्त ताण कमी करणे आणि आगामी काळात संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता रोखण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात नवीन बोरवेल व विहिरीचे खोदकाम तसेच अस्तित्वात असलेल्या बोरवेल व विहिरीचे अधिक खोलीकरण करण्याच्या कामांवर पुढील आदेशापर्यंत तातडीची बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष वानमथी सी यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.

भूजलसाठ्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि अनियंत्रित बोरवेल व विहिरींच्या खोदकामामुळे भूजलसाठ्यावर निर्माण होणारा अतिरिक्त ताण टाळणे, हा या आदेशामागील प्रमुख उद्देश आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ३० व ३४ तसेच महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण क्षेत्रात नवीन बोरवेल खोदणे, नवीन विहिरींचे खोदकाम करणे, नवीन बोरवेल किंवा कूपनलिका खणणे तसेच अस्तित्वात असलेल्या बोरवेल व विहिरीचे अधिक खोलीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बंदी खासगी व्यक्ती, शेतकरी, गृहबांधकाम संस्था, उद्योग, व्यावसायिक आस्थापना, संस्था तसेच बोरवेल खोदकाम करणारे ठेकेदार, रिगमलार्क व यंत्रचालक यांना लागू राहणार आहे.

मात्र, अस्तित्वात असलेल्या विहिरी किंवा बोरवेलचा नियमित वापर करण्यावर या आदेशाद्वारे बंदी घालण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय पाणीपुरवठा कामांना नियमानुसार अपवाद देण्यात आला आहे. अशा कामांसाठी संबंधित सक्षम प्राधिकरणाची पूर्वलिखित प्रशासकीय मंजुरी, आवश्यक तांत्रिक शिफारस आणि लागू भूजलविषयक परवानग्या घेणे बंधनकारक राहणार आहे. केवळ शासकीय यंत्रणेमार्फत काम होत असल्याच्या कारणावरून कोणत्याही कामाला आपोआप सूट मिळणार नाही.

यापूर्वीपासून सुरू असलेल्या प्रतिबंधित खोदकामाच्या कामांनाही या आदेशाच्या क्षेत्रेत घेण्यात आले आहे. वैध परवानगी किंवा शासकीय अपवाद नसलेली नवीन बोरवेल व विहिरींची खोदकामे तसेच अधिक खोलीकरणाची कामे तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित मालक, ठेकेदार व यंत्रचालक यांनी खोदकामाची यंत्रसामग्री सुरक्षित स्थितीत ठेवावी आणि उघडी विहीर किंवा बोरवेलमुळे नागरिक, पशुधन अथवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक प्रतिबंधत्मक उपाययोजना कराव्यात.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध लागू कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. परिस्थितीचा आढावा, भूजल उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची गरज आणि संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या शिफारसीचा विचार करून या आदेशात आवश्यकतेनुसार बदल, शिथिलता किंवा रद्द करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. तोपर्यंत हा आदेश वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण क्षेत्रात लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *