काही सेकंदांपूर्वीच पाच ते सहा जण उभे होते; केळीच्या हातगाडीचे नुकसान
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : शहरातील गजबजलेल्या बजाज चौकात मुडके बुक स्टॉलजवळ असलेल्या झाडाची मोठी फांदी अचानक सायंकाळाच्या सुमारास कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, काही सेकंदांपूर्वीच याच ठिकाणी पाच ते सहा जण उभे होते. ते बाजूला गेल्यानंतरच फांदी कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.
बजाज चौक हा नेहमीच नागरिकांच्या गर्दीचा परिसर आहे. मुडके बुक स्टॉलजवळ नागरिकांची ये-जा सुरू असतानाच झाडाची मोठी फांदी अचानक खाली कोसळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली. फांदी कोसळल्याने जवळील केळी विक्रेत्याचे हातगाडीचे नुकसान झाले.
काही सेकंदांचा फरक आणि मोठा अनर्थ टळला! झाडाखाली उभे असलेले नागरिक काही क्षणांपूर्वीच तेथून बाजूला झाल्याने जीवितहानी टळली. शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या जुन्या आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची वेळीच छाटणी करण्याची गरज या घटनेने अधोरेखित झाली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने अशा झाडांची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.