वर्धा (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. पहिल्या दिवशी महाराजांच्या जीवनावर आधारित कविता व पोवाडे तसेच लघुनाटीकेचे सादरीकरण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विकास भवन येथे उद्घाटन समारंभ पार पडला. उद्घाटन प्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, लोकशाहीर संजय भगत, शिक्षक प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कविता व पोवाड्यांचे सादरीकरण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा, वडद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लघुनाटीकेने उपस्थितांची मने जिंकली. या नाटिकेत महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला. प्रणिती डंभारे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी मानले. संचालन ज्योती भगत यांनी केले.
आज पदयात्रा व महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम
दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून झाशी राणी चौक, मुख्य पोस्ट ऑफिस, विकास भवन असा मार्ग राहणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.