एलनिनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाण्याचा सुयोग्य वापर करावा : जिल्हाधिकारी वान्मथी सी

गट पिक प्रात्यक्षिक क्षेत्रावर ‘शेतकरी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन

वर्धा (जिमाका):

एलनिनोच्या प्रभावामुळे शेतीकरिता पाण्याचा सुयोग्य वापर करणे अतिशय आवश्यक आहे. बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी शेतीसोबत आधुनिक शेती पद्धती तसेच कृषी आधारित पुरवठा व्यवसाय देखील करावा. शेतकऱ्यांनी पिक विमा काढून आपली पिके सुरक्षित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, सेलसुराच्यावतीने सेवा संकल्प अभियान दरम्यान आर्वी तालुक्यातील खरागना येथील प्रगतिशील शेतकरी शिरीश महल्ले यांच्या शेतावर ‘पीडीकेकेवी अंबा’ या सोयाबीनच्या सुधारित वाणाच्या गट पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कटोरे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र उघाडे, मंडळ कृषी अधिकारी विजय खोंडे उपस्थित होते.

हंगामातील पिक परिस्थितीवर चर्चा:

यावेळी वान्मथी सी यांनी शेतकरी व महिला शेतकरी यांच्यासोबत खरीप हंगामातील पिक परिस्थिती व येणाऱ्या रब्बी हंगामातील पिक नियोजन विषयी सखोल चर्चा केली.

शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिडीकेकेवी अंबा हे सुधारित वाण प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात बघितल्याने शाश्वती मिळते. हे वाण कीड व रोगांना बळी पडणारे नसून अधिक उत्पन्न देणारे वाण आहे. कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण विषयी अरविंद उपरीकर यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. जीवन कटोरे यांनी सोयाबीनचे पिडीकेकेवी अंबा वाणाच्या वैशिष्ट्ये विशद केले तसेच शेती दिनाचा उद्देश सांगतला, एलनिनोच्या परिस्थितीनुसार सोयाबीन पिडीकेकेवी अंबा वाण हे इतर वाणाच्या तुलनेत बदलत्या वातावरणात टिकून राहते यावर भर देत सोयाबीन, तूर व कपाशी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, रुंद सरी वरंबा पद्धतीचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन व उपक्रम:

कृषिविद्या विषयतज्ज्ञ डॉ. भारती तिजारे यांनी सोयाबीन – पिडीकेकेवी अंबा वाणाच्या शेतकऱ्यांच्या शेतावर गट पिक प्रात्यक्षिके यशस्वीपणे राबविले. पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी विविध प्रकारचे चाय लागवड व त्याचा दुग्ध जनावरांना होणार फायदा व एलनिनो दरम्यान जनावरांकरिता करावयाच्या उपयोजनाबाबत माहिती दिली. कृषी अभियांत्रिकी विषयतज्ज्ञ डॉ. सविता पवार यांनी रुंद वरंबा व सरी पद्धतीचा अवलंब केल्यास होणारे फायदे विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ज्ञ डॉ. अंकिता अंगईतकर यांनी मानले.

कार्यक्रमच्या आयोजनाकरिता कृषी विभागातील एम. वाय. नेले, एस.एन. काळपांडे, रुपेश चौधरी, श्री. बगे, मनीष लीडबे, नीलिमा अक्कलवार, गजेंद्र मानकर, गणेश वायरे, वैभव चौधरी व ग्रामस्थांनी योगदान दिले, असे कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *