वर्ध्यातील बजाज चौकातील सौंदर्यीकरणासाठी उभारलेले घड्याळ बंद

जनतेच्या पैशांचा हिसाब द्या!; नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; घड्याळाची दुरुस्ती करून खर्च व देखभालची तपशील जाहीर करण्याची मागणी

वर्धा: वर्धा शहरातील मुख्य बजाज चौकात सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने उभारण्यात आलेले भव्य घड्याळ बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास आशिष सोनोटक्के यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता घड्याळ बंद असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भातील छायाचित्रही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी खर्च करण्यात आलेल्या सार्वजनिक निधीच्या वापराबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.

सौंदर्य झाले, पण घड्याळ बंद!: शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी आकर्षक रचना उभारणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, अशा विकासकामांसाठी खर्च होणारा पैसा हा सर्वसामान्य नागरिकांच्या करातून जमा झालेला असतो, त्यामुळे कामाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि नियमित देखभाल यांची जबाबदारी संबंधित प्रशासनावर असते. बजाज चौकातील घड्याळ आकर्षक रोषणाईमुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत असले, तरी ते बंद असल्याचे आढल्याने या कामाच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. घड्याळ उभारण्यामागील उद्देश नागरिकांना वेळ समजणे आणि चौकाचे सौंदर्य वाढवणे हा असेल, तर ते नियमितपणे सुरू राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ दिखाव्यासाठी लाखोंचा खर्च झाला आहे, कामाच्या गुणवत्तेची योग्य तपासणी झाली आहे का आणि देखभालची व्यवस्था नेमकी काय आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती देण्याची गरज आहे. प्रत्यक्ष खर्चाची माहिती उपलब्ध नसल्याने या कामावर किती निधी खर्च झाला, याबाबत अधिकृत खुलासा होणे आवश्यक आहे.

नगरपरिषद प्रशासनाला थेट सवाल!: बजाज चौकातील बंद घड्याळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून पुढील प्रश्न उपस्थित केले जात आहेत:

  1. घड्याळ उभारण्यासाठी नेमका किती निधी खर्च करण्यात आला?

  2. या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता कोणत्या आधारावर देण्यात आली?

  3. कामाचा ठेका कोणत्या ठेकेदाराला देण्यात आला आणि काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे का?

  4. घड्याळाची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाकडे किंवा ठेकेदाराकडे आहे?

  5. घड्याळ बंद असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे का? आली असल्यास दुरुस्तीसाठी कोणती कार्यवाही करण्यात आली?

  6. या कामाच्या गुणवत्तेची, खर्चाची आणि देखभाल व्यवस्थेची तपासणी करण्यात आली आहे का?

  7. घड्याळाच्या देखभालीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद आहे का? असल्यास त्याचा किती खर्च झाला? जनतेच्या कराच्या पैशांचा हिसाब जनतेला मिळाला पाहिजे!

नागरिक कर भरतात तो शहराचा विकास व्हावा आणि त्यांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा मिळाव्यात यासाठी. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने बजाज चौकातील घड्याळाची तातडीने पाहणी करून ते कार्यान्वित करावे, अशी मागणी होत आहे.

यासोबतच घड्याळ उभारणीवरील खर्चाचा तपशील, ठेकेदाराचे नाव, कामाच्या मंजुरीची कागदपत्रे, देखभाल खर्च आणि गुणवत्ता तपासणीचा अहवाल सार्वजनिक करावा. संबंधित कामात गुणवत्तेच्या त्रुटी, करारातील अटींचे उल्लंघन किंवा आर्थिक अनियमितता आढळ्यास नियमानुसार जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करावी.

विकासकामे केवळ दिखाव्यासाठी नकोत!: शहरातील विकासकामे ही केवळ आकर्षक दिखण्यासाठी नव्हे, तर नागरिकांच्या प्रत्यक्ष उपयोगासाठी आणि दीर्घकाळ टिकणारी असली पाहिजेत. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांची नियमित देखभाल करणे ही संबंधित यंत्रणेची महत्त्वाची जबाबदारी आहे. बजाज चौकातील घड्याळ बंद असल्याच्या प्रकाराची नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी. घड्याळ बंद पडण्याचे कारण, दुरुस्तीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती नागरिकांसमोर मांडावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *