कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हातात भोपळा कशाला

शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर सरसकट कर्जमाफी करा – खासदार अमर काळे यांचा राज्य सरकारवर घणाघाती हल्ला

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

वर्धा:शेतकरी संकटात आहे, खरीप पिकांचे उत्पादन ५० ते ६० टक्क्यांनी घटले असून, कर्जाचा डोंगर आणि दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत घोषणांचा पाऊस पाडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा पैसा जमा करा, सरसकट कर्जमाफी द्या आणि पंचनाम्यांच्या कागदी घोड्यांचा खेळ बंद करा, अशी आक्रमक मागणी खासदार अमर काळे यांनी राज्य सरकारकडे केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील अटींवर टीका करताना काळे म्हणाले की, सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करते; मात्र प्रत्यक्ष लाभ देण्याची वेळ आली की केवायसी, कर्जाचा थकबाकीचा कालावधी अशा अटींचे जाळे उभे केले जाते. परिणामागी, कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडण्याची भीती आहे.

बँकांना आर्थिक दिलासा मिळणार असेल, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यंदा कमी पाऊस आणि पावसातील दीर्घ खंडामुळे शेतीचे गणित कोमटले आहे. ऑक्टोबरमध्येही पाऊस न झाल्यास खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांवर संकट ओढवू शकते. तरीही अधिकाऱ्यांच्या अहवालावर विसंबून केवळ २६२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याला मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा मुद्दाही काळे यांनी उपस्थित केला.

आर्वी तालुक्यात पिंपळखुटा परिसरातील शेतात दुष्काळी परिस्थिती असताना लगतच्या दानापूरमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या निकषांचा सामना करावा लागतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुष्काळ जाहीर होऊन महिना उलटला तरी पंचनामे, पीक नोंदणी, फार्मर आईडी, वारस नोंदणी आणि केवायसीच्या अटींमध्ये शेतकऱ्यांना अडकवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारच्या दारात हात पसरण्याची वेळ आणू नका, सातबारा आणि उपलब्ध सरकारी नोंदींच्या आधार मदत देण्याची प्रक्रिया सुलभ करा.

सरसकट कर्जमाफी जाहीर करा आणि विरंब न करता मदतीची रक्कम थेट खात्यात जमा करा. आश्वासनांचे राजकारण थांबवून शेतकऱ्यांना जगण्यासाठी तातडीने निर्णय घ्या, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *