योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठ्यासाठी कृषिपंपाला कॅपेसिटर बसवा

महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : यंदा पावसाने दंडी मारल्यामुळे शेतीसाठी पाणी उपसाची गरज निर्माण झाली असून, संपूर्ण नागपूर जिल्ह्यासह विदर्भात कृषिपंपांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वीज पुरवठा सुरू होताच शेतातील कृषिपंप आपोआप सुरू व्हावेत यासाठी अधिकांश शेतकऱ्यांनी पंपांना ऑटोस्विच बसवले आहेत. मात्र, या ऑटोस्विचमुळे एकाच वेळी रोहित्रावरील सर्व कृषिपंप चालू होऊन वीज यंत्रणेवर अचानक मोठा भार पडतो. परिणामी, रोहित्र जळणे, वीज वाहिन्यांच्या तारा तुटणे, वारंवार ट्रिपिंग होणे आणि ऐन मोक्याच्या वेळी पिकांना पाणी देण्याच्या काळात वीज खंडित होणे अशा गंभीर समस्या निर्माण होत आहेत. या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कृषिपंपाला योग्यक्षमतेचा कॅपेसिटर बसवून वापरात असलेले ऑटोस्विच तात्काळ काढून टाकावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शेतामध्ये प्रामुख्याने थ्री-फेज इंडक्शन मोटरचा वापर केला जातो. या मोटारी सुरू असताना आणि चालताना वीज वाहिन्यांवर आवश्यकतापेक्षा सुमारे ३० टक्के इंडक्टिव्ह करंट म्हणजेच रिॲक्टिव्ह पॉवर खेचतात. यामुळे वाहिनिवर प्रचंड ताण येऊन मोटारी जळणे, ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊन जळणे, लाइनमध्ये वारंवार फॉल्ट होणे आणि एलटी लाईन ट्रिप होण्याचे प्रकार घडतात. महावितरणच्या दृष्टीने ही वीज यंत्रणेवरील अतिरिक्त ताणाani वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडाची सर्वात मोठी समस्या ठरत आहे.

कॅपेसिटर हे एक साधे परंतु अत्यंत प्रभावी उपकरण आहे. ते कृषिपंपाला लागणारी रिॲक्टिव्ह पॉवर थेट स्थानिक पातळीवरच पुरवते. यामुळे मुख्य वीज वाहिनीवरून वाहणारा अतिरिक्त ३० टक्के वीज प्रवाह लगेच कमी होतो. परिणामी, महावितरणला सर्व ग्राहकांना योग्य व उच्च दाबाने अखंडित वीज पुरवठा देणे शक्य होते. तसेच ट्रान्सफॉर्मर जळणे, वीज तारा तुटणे आणि मोटर खाक होण्यासारख्या मोठ्या नुकसानांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते. बाजारात एल अँड टी, कॅपको, हॅवेल्स यांसारख्या विविध नामांकित कंपन्यांचे दर्जेदार कॅपेसिटर सहज उपलब्ध आहेत. कृषिपंपाच्या क्षमतेनुसार ३ एचपी मोटारीसाठी १ केव्हीएआर, ५ एचपी मोटारीसाठी २ केव्हीएआर तर ७.५ एचपी मोटारीसाठी ३ केव्हीएआर क्षमतेचा कॅपेसिटर पुरेशा ठरतो. अवघ्या ३०० ते ५०० रुपयांच्या नाममात्र खर्चात मिळणाऱ्या या लहानशा उपकरणांमुळे शेतकऱ्यांची हजारो रुपयांची मोटर जळण्यापासून वाचते. शिवाय, ऐन पिकांच्या वाढीच्या टप्प्यात वीज पुरवठा खंडित न होता बेलेबर पाणी मिळाल्याने शेतातील उत्पादनात होणारी मोठी घट देखील सहज टाळता येते.

कॅपेसिटरचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी त्याची योग्य ठिकाणी जोडणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कॅपेसिटर लावताना तो इनकमींग म्हणजेच मुख्य वीज पुरवठा साइडला न लावता नेहमी स्टार्टर आणि मोटरला जोडलेल्या वायरच्या दरम्यान लावावा. अशा प्रकारे जोडणी केल्यामुळे जेव्हा मोटर सुरू होईल, केवळ त्याच वेळी कॅपेसिटरचे कार्य सुरू राहीलं आणि मोटर बंद असताना तो अनावश्यकपणे चालू राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्वरित कॅपेसिटर बसवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवार (दि. ९ ऑक्टोबर) नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी खापरखेडा उपविभागांतर्गत असलेल्या घोगली गावातील शेतकरी राजू उकुंदराव राऊत यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी राजू राऊत यांना कॅपेसिटरचे तांत्रिक महत्व समझावून सांगितले, तसेच महावितरणतर्फे त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात एक कॅपेसिटर भेट देऊन त्याचा तात्काळ वापर सुरू करण्याचे सुचवले. महावितरणच्या या उपक्रमाचा आदर्श घेत परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ऑटोस्विच काढून कॅपेसिटर बसवावेत, असे आवाहन प्रसंगी करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता मंगेश कहाळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *