रात्री १० वाजताची घटना; वीजपुरवठा खंडित, दोन विद्युत खांब बदलण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : सेवाग्राम येथील आदर्शनगर वसाहतीमध्ये रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास ट्रॅक्टरने विद्युत खांबाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत विद्युत खांब तुटून पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात स्पार्क झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेमुळे वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरचालक मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर घेऊन वसाहतीत आल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट विद्युत खांबावर जाऊन आदळला. धडकेची तीव्रता इतकी होती की विद्युत खांब तुटला आणि मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली, घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थलळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच दीपपक भोंगडे यांनी विद्युत विभागाशी संपर्क साधून संबंधित लाइनमन विकास गजभिये यांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर विद्युत विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रात्री घटनास्थलळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक कार्यवाही केली.
तुटलेल्या विद्युत खांबामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला, तर इतर भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. या घटनेत नुकसान झालेल्या दोन विद्युत खांबांच्या बदलण्याचा निर्णय विद्युत विभागाने घेतला असून, आजपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे माहिती विभागाकडून मिळाली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
वसाहतीमध्ये अशा प्रकारे विद्युत खांबाला धडक बसल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवर वाहन चालविताना चालकांनी सावधानी बाळगणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे टाळणे आवश्यक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. विद्युत विभागाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून, खांब बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित भागातील वीजपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.