जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते नशामुक्त जनजागृती रॅलीचा शुभारंभ
वर्धा (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात नशामुक्त भारत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी वानथी सी यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी वानथी सी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार व अन्य अधिकारी उपस्थित होते. रॅलीमध्ये नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनी, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी, अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
जनजागृती रॅली महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून निघून जिल्हा परिषद सभागृहात पोहोचली. रॅली समाप्तीनंतर सिंधुताई सपकाळ सभागृहात नशामुक्तीबाबत प्रमुख वक्त्यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन होते. यावेळी श्री.सोमन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी तुकाराम घोडे, संघपाल पाटील, सुभाष येनोरकर, नशामूक्ती मित्र हरीशचंद्र पाल यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
यावेळी पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना चित्रकित दाखवून मार्गदर्शन केले. मानिकद्वारा बहुउद्देशीय संस्था आष्टीच्या अध्यक्षा प्रतिका दापुरकर यांनीही विद्यार्थ्यांना नशामुक्तीबाबत मार्गदर्शन केले. शेवटी हभप नामदेव काळे महाराज यांनी त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. सदर कार्यक्रम जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि इंदिरा गांधी व्यसनमुक्ती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.