वर्धा (जिमाका) : ग्रामीण भागातील जनतेने रोजगारासाठी शहरांकडे धाव घेण्यापेक्षा गावातच राहून स्वतःचा उद्योग उभा करावा. आमचे सरकार केवळ योजना जाहीर करत नाही, तर ग्रामीण तरुणांना आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करीत आहे. ग्रामीण युवक व महिलांना काम देणारा उद्योजक बनवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
सालोड (हिरापूर) येथे गोट मार्केट यार्ड, परिवहन विभागाच्या कार्यालयाची संरक्षण भिंत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध विकासकामांच्या २५ कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन मंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आमदार राजेश बकाणे, माजी खासदार रामदास तडस, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, सालोडचे सरपंच अमोल कत्राके, उपसरपंच आशिष कुचेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुक्कतारे, कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, जिप बांधकामाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, राहुल चोपडा आदी उपस्थित होते.
गोट मार्केट यार्डमुळे वर्धा जिल्ह्यात आता वेगवेगळ्या जातींच्या शेळ्या-मेंढ्यांचे संशोधन आणि प्रदर्शन होईल. यासाठी मोठे क्लस्टर तयार करण्यात येत आहे. ग्रामीण भागात ‘गवळाऊ’ जातीच्या गायींचे संवर्धन करणाऱ्या गवळी समाजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. या जातीच्या गायींची संख्या आणि दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी आम्ही सर्व मिळून विशेष प्रयत्न करणार आहोत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
युवकांसाठी नवीन योजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण उद्योजकांसाठी सरकार ५० टक्के अनुदान देते. यासोबतच सोलर युनिटसाठी सबसिडी आणि व्याजात सवलत देऊन तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. तुम्ही गावातच उद्योग करा, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी तरुणांना केले.
महिलांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक केले. वर्षाला १८ हजार रुपये देऊन महिलांचा स्वाभिमान जपत आहेत. आज महिलांना एसटी प्रवासामध्ये सुट देण्यात येते, त्यामुळे त्या स्वतःच्या हिंमतीवर कुठेही जाऊ शकतात. आई मुलाला जन्म देते, पण त्याचे पोषण करण्याचे आणि त्याला सुदृढ करण्याचे काम अंगणवाडी ताई करतात. कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.