जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात, युवकांच्या कलागुणांना वाव

वर्धा (जिमाका) : युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, संस्कृती व परंपरेचे जतन करणे, सुप्त गुणांना वाव देणे आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

विकास भवन येथे हा महोत्सव पार पडला. यंदाच्या महोत्सवासाठी ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती. या महोत्सवाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी संजय तेली व उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले..

जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाचा उद्देश आणि युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून युवकांना अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कविता लेखन अशा पाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. समूह लोकनृत्य स्पर्धेत बजाज कॉलेज ऑफ सायन्सने प्रथम, जी. एस. कॉमर्स सीनियर कॉलेज यांनी द्वितीय तर जी. एस. कॉमर्स जूनियर कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला. समूह लोकगीत स्पर्धेत यशवंत महाविद्यालयाने प्रथम, बजाज कॉलेज ऑफ सायन्सने द्वितीय आणि जी. एस. कॉमर्स कॉलेजने तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. समूह लोकनृत्य स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. समूह लोकगीत व पथनाट्य स्पर्धेसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार ५०० रुपये तर चित्रकला व कविता लेखन स्पर्धेसाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार ५०० रुपये रोख पारितोषिक वितरीत करण्यात आले.

या सर्व स्पर्धांचे परीक्षण जीवन बांगडे, संदीप चीचाटे, आशिष पोहाणे, डॉ. तेजस्वी एच. आर., राजेश डांबरे, विपिन मगरे, अरविंद भोसकर, किरण खडसे व खुशबू कठाने यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे यांनी मानले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी संदीप खोब्रागडे, जमीर अत्तार, गणेश याल्लावार, अनिल निमगडे, सायली चत्रावार, सांजली वानखेडे, मंजूषा जाधव, विश्वास बोकडे, रवींद्र काकडे, योगेश कुकडे, अशोक पेडेकर, नाना टेकाम व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *