जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीची आढावा बैठक
पीक पंचनामे कालमर्यादित पूर्ण करा
वर्धा(जिमाका) : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी पिकनिहाय व शेतकरीनिहाय वस्तुस्थितीदर्शक पंचनामे प्राधान्याने पूर्ण करावेत. पंचनामे व डिजिटल क्रॉप सर्व्हे करताना कोणत्याही प्रकारची हयगय अथवा निष्काळजीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणवीर, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीपती मोरे, उपविभागीय अधिकारी कुश मोतवाणी, विश्वास शिरसाठ, आकाश अवतारे यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दुष्काळ व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी परस्पर समन्वय ठेवून पिकनिहाय आणि शेतकरीनिहाय पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती अचूकपणे नोंदविली गेली पाहिजे. शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक अचूक नोंदविण्याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
डिजिटल क्रॉप सर्व्हेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देताना त्यांनी क्रॉप सर्व्हे आणि पंचनाम्याच्या कामात अचूकता व पारदर्शकता असली पाहिजे. एग्रीस्टॅक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेऊन आवश्यक नोंदणीची कार्यवाही पूर्ण करावी. दुष्काळ व्यवस्थापनासाठी टंचाई आराखडा प्रभावीपणे तयार करून तो मंजूर झाल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणीटंचाई आराखडे तयार करावेत. जलसंधारणाची कामे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि चारा टंचाई याबाबत आतापासूनच नियोजन करावे. पाणीपुरवठ्याशी संबंधित अवैध कनेक्शनवर कार्यवाही करून ते तातडीने बंद करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी टीमवर्कच्या माध्यमातून दुष्काळ व्यवस्थापनाची कार्यवाही करावी. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या उपलब्ध स्रोत, विहीर अधिग्रहण तसेच पाणीपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष द्यावे. मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्या बैठका घेऊन त्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून संभाव्य टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी दिल्या.
बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची स्थिती, पंचनामे, डिजिटल क्रॉप सर्व्हे, पाणीटंचाई, चारा उपलब्धता, जलसंधारणाची कामे तसेच टंचाई आराखड्याच्या तयारीबाबत संबंधित विभागांकडून आढावा घेण्यात आला. तसेच दि. २५ सप्टेंबरच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.