पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमतेसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात २१ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना पत्र देत डॉ. भोयर यांनी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधले. बँकेची स्थापना २१ ऑक्टोबर १९१२ रोजी झाली असून तिला ११४ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. सन २००२ पासून बँक आर्थिक अडचणीत आली होती. सन २०१४ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून तेव्हापासून प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. जिल्हा सहकारी बँक आर्थिक संकटात सापडल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी व कष्टकऱ्यांची रक्कम बँकेत अडकले होते.
बँकेला आर्थिक बळ देऊन तिचा बँकींग परवाना पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आपणाकडे केली होती. या मागणीची आपण दखल घेत बँकेला केंद्र व राज्य शासनाकडून अनुक्रमे २२.१७ कोटी रुपये व १३९ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले होते. त्यामुळे बँकेचा परवाना पुनरुज्जीवित करण्यात आला आहे. बँकेला सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशासकाची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आपल्या निवेदनातून अधोरेखित केले आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत संबंधितांना योग्य निर्देश द्यावेत, अशी विनंती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. ही नियुक्ती झाल्यास बँकेच्या प्रशासकीय व आर्थिक कारभाराला अधिक सक्षम दिशा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मागणीची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेत सहकार विभागाचे प्रधान सचिव यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.