पालकाने शाळेतून शेतात नेलेल्या दोन चिमुकल्या बहिणींचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू!

 

सेलूतील साटोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; घटनेमागील नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार

 

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

सेलू : सेलू शहरातील गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल आणि स्कूल ऑफ ब्रिलियंटमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन चिमुकल्या बहिणींचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी कोलगाव शिवारात उघडकीस आली. या घटनेने सेलू शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धान्य मार्केटसमोर राहणाऱ्या साटोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत मुलींमध्ये दिव्या सचिन साटोने (वय ८) आणि उन्नती सचिन साटोने (वय १०) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालक सचिन साटोने यांनी दोन्ही मुलींना शाळेतून बाहेरगावी जाण्याचे कारण सांगून सुट्टी घेतली आणि त्यानंतर त्यांना कोलगाव शिवारातील शेतात नेले होते.

काही वेळानंतर दोन्ही मुली विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून त्या विहिरीत पडल्याचे सांगितले जात असले, तरी घटनेच्या परिस्थितीबाबत विविध चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पालकाने मुलींना वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतल्याचेही सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णमित्र प्रज्वल लटारे तसेच सेलू पोलिस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे, प्रशांत श्रीवास्तव, राकेश देवगडे, मंगेश राऊत आणि नितीन डाखोळे यांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलींना विहिरीतून बाहेर काढले. दोन्ही मुलींचे मृतदेह सेलू ग्रामीण रुग्णालयात उत्तरोप तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

सचिन साटोने यांना तीन मुली असून, तिसरी मुलगी देवयानी ही स्कूल ऑफ ब्रिलियंटमध्ये सहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती गावातील गणपती उत्सवानिमित्त मैत्रिणीकडे जेवणासाठी गेली होती. त्यामुळे ती या घटनेतून वाचल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून, घटनेची नेमकी परिस्थिती, मृत्यूचे कारण आणि इतर तपशील पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सेलू परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *