अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांचे प्रतिपादन
राजेश मडावी लिखित ‘शताब्दीची साक्ष’ ग्रंथाचे प्रकाशन
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
वर्धा: पत्रकारिता ही केवळ घटनांचे वृत्तंकन करणारे माध्यम नसून, समाजातील परिवर्तनाची दिशा अधोरेखित करणारे साधन आहे. वर्धा-सेवाग्राम परिसरातील पत्रकारितातेला गांधी-विनोबांच्या विचारणा समृद्ध वारसा लाभला आहे. या १०० वर्षांच्या परंपरा अभ्यास व दस्तावेजनीकरण करणारा राजेश मडावी लिखित ‘शताब्दीची साक्ष: वर्धा-सेवाग्रामची पत्रकारिता’ हा ग्रंथ पत्रकारिता व संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. गांधी विनोबांच्या भूमीतील पत्रकारितेत देशाच्या प्रेरणेचे बळ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्था व वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १९) सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात पत्रकार लेखक राजेश मडावी लिखित व स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशिन ‘शताब्दीची साक्ष: वर्धा-सेवाग्रामची पत्रकारिता’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीमंत माने प्रमुख अतिथी व भाष्यकार म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे प्रदीप दाते, विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंडे, स्तंभ पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक अविनाश पोईनकर उपस्थित होते.
वर्धा-सेवाग्रामच्या भूमीतील १८८६ ते १९८६ या शंभर वर्षातील गांधी, विनोबा, सत्यशोधक आणि आंबेडकरी विचारांच्या पत्रकारितेच्या विविध प्रवाहांचा सखोल मागोवा घेत या इतिहासाचे जतन ग्रंथातून झाले आहे, असे मत राज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केले.
भाष्यकार म्हणून श्रीमंत माने म्हणाले, “‘शताब्दीची साक्ष: वर्धा-सेवाग्रामची पत्रकारिता’ हे पुस्तक केवळ गांधी-विनोबा आणि वर्धा-सेवाग्रामच्या इतिहासापुरते मर्यादित नाही; तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या व्यापक इतिहासाचे वर्धा-सेवाग्रामशी असलेले अतूट नाते प्रभावीपणे अधोरेखित करते. गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या कार्याचे स्थानिक पातळीवर उमटलेले पडसाद, त्या काळातील सामाजिक परिस्थिती तसेच जैन समाजाने मराठी साहित्याच्या विकासासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान यांचे मौलिक दस्तावेजीकरण हे या पुस्तकाचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे.”
प्रास्ताविक राजेंद्र मुंडे यांनी केले. संचालन ज्योती भगत यांनी केले. प्रवीण धोपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विदर्भातील साहित्य, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील पत्रकारितेचे पहिले वर्धा गॅझेट
महाराष्ट्रात जिल्हास्तरीय पत्रकारितेचा सलग आणि अभ्यासपूर्ण मागोवा घेणारा ग्रंथ आजवर उपलब्ध नव्हता. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी घट्ट जोडलेल्या वर्धा, पवनार-सेवाग्रामच्या भूमीतून प्रकाशित होणारा ‘शताब्दीची साक्ष: वर्धा-सेवाग्रामची पत्रकारिता (१८८६-१९८६)’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील पत्रकारितेचे पहिले वर्धा जिल्हा गॅझेट ठरले आहे. त्यामुळे पत्रकारिता व वैचारिक संशोधन क्षेत्रात या ग्रंथाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.