घराला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान, सिंदी (मेघे) येथील सोमनाथे ले आऊट परिसरातील घटना

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : शहरालगतच्या सिंदी (मेघे) येथील सोमनाथे ले आऊट परिसरात घराला अचानक आग लागली. त्यामध्ये घरातील साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.

सिंदी (मेघे) येथील सोमनाथे ले आऊटमधील मधुकर मसराम यांच्या घरी दुपारच्या सुमारास कुणी नव्हते. त्यांच्या घरातून आगीचा धूर निघत असल्याचे परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले. शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत माहिती मिळताच वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा फवारा सुरू केला. स्थानिकांच्या मदतीने काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान, आगीमध्ये घरातील साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घटनास्थळी रामनगरचे ठाणेदार, पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील युवक, नागरिकांनी प्रयत्न केले. यावेळी सिलिंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आगीचे नेमके कारण कळू शकले नसून शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत होता. मधुकर मसराम यांनी बुधवारीच गहू, तांदूळ आदी धान्य खरेदी करून आणले होते. पण, आगीमध्ये हे धान्य जळाले. तसेच टिव्ही, कपडे, मोबाईल, खुर्च्या आणि इतरही जीवनावश्यक साहित्याची आगीमध्ये राखरांगोळी झाली. त्यामुळे मसराम यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. नुकसानीपोटी मसराम यांना मदत द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *