ब्रिटिश हुकूमतही बरी होती; भाजप सरकार अतिशय क्रूर आणि अहंकारी: खासदार अमर काळे यांचा घणाघाती हल्ला
प्रतिनिधी : दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : देशातील शिक्षण व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चाललेला खेळ याविरोधात आता विरोधक आणि युवा शक्ती आक्रमक झाली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मैदानात उतरले आहेत. या आंदोलनाला भेट दिल्यानंतर वर्धा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली. ‘आजचे भाजप सरकार हे ब्रिटिश हुकूमतीपेक्षा अधिक क्रूर आणि अहंकारी आहे,’ असा थेट आणि घणाघाती आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांवर लाठीमार अन् गुन्हे; सरकारकडे उत्तर नाही!
माध्यमांशी बोलताना खासदार अमर काळेम्हणाले, ‘देशातील शिक्षणव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बनला आहे. आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांच्यासोबत आज आम्ही आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. संसद भवन गेल्या दोन दिवसांपासून ठप्प आहे, परंतु या गंभीर विषयावर चर्चा करायला सत्ताधारी तयार नाहीत.’
तसेच, ‘आंदोलन करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना मारहाण केली जात आहे आणि गंभीर कलमे लावून दडपशाही सुरू आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधींनी येरवडा तुरुंगात उपोषण केले होते, तेव्हा ब्रिटिशांनी चौथ्या दिवशी चर्चा करून उपोषण सोडवले होते. मात्र, आजचे भाजप सरकार ब्रिटीशांपेक्षाही कठोर आणि निष्ठुर झाले आहे,’ असेही ते म्हणाले.
२९ मध्ये युवा शक्तीची भाजपला हद्दपार करणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत खासदार काळे म्हणाले, ‘ज्या युवा शक्तीने २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवले, तीच युवा शक्ती येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत भाजपला या देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. ही आजची जंतर-मंतरवरील परिस्थिती स्पष्ट सांगत आहे.’
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत असून, केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे देशभरातील युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.