दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चार्‍याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण

केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी दौरा सुरू; ११ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय पथकाचा महाराष्ट्र दौरा

मुंबई: खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयिय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. ११ ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून, पाऊस, पीक नुकसान, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चार्‍याच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

केंद्राच्या कृषी व शेतकरी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल हे पथकाचेप्रमुख आहेत. केंद्र शासनाच्या कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि अन्य संबंधित विभागांतील प्रशासकीय व तांत्रिक अधिकाऱ्यांचा पथकात समावेश आहे.

राज्य शासनाकडून दुष्काळी स्थितीचे सविस्तर सादरीकरण

  • केंद्रीय पथकाच्या मुंबईतील आगमननंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी पावसाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील काही भागात निर्माण झालेली पाणीटंचाई, टँकरची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांकडे स्थलांतराची शक्यता आणि शेतकरी आत्महत्या या बाबींकडे केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले.

  • राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने अपर मुख्य सचिव विनिता बेद-सिंगल यांनी राज्यातील पावसाची स्थिती, अल निनोमुळे हवामान आणि पावसावर झालेले परिणाम तसेच शेतीपिकांच्या नुकसानीची सविस्तर आणि तांत्रिक माहिती दिली, पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबतही सविस्तर आढावा सादर करण्यात आला.

  • कृषी विभागाच्या वतीने सचिव परिमल सिंह आणि आयुक्त सुरज मांढरे यांनी राज्यातील पिकांच्या नुकसानीची आणि जिल्हानिहाय परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती केंद्रीय पथकासमोर मांडली.

  • पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी जनावरांच्या चार्‍याची सद्यस्थिती तसेच आगामी सात महिन्यांसाठीच्या संभाव्य परिस्थितीची माहिती दिली.

पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा व ऊर्जा विभागाचे सादरीकरण

  • राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. सध्या टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा, मागील तीन वर्षांच्या तुलनेतील पाण्याची स्थिती आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गावाची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन तथा भूजल सर्वेक्षण व विकास आयुक्त खोंडे खेबुडकर यांनी सादर केली. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, रोजगार हमी योजनेचे सचिव अप्पासाहेब धूळज यांच्यासह ऊर्जा विभागाच्या वतीने सद्यस्थितीचा आढावा सादर करून आगामी सात महिन्यातील संभाव्य परिस्थितीची माहिती दिली. यावेळी लघुपाटबंधारे तलाव (एमआय टँक), गावामधील पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली.

प्रत्यक्ष पाहणीसाठी जिल्हे आणि ठिकाणे निश्चित

  • राज्य शासनाने सादर केलेली आकडेवारी, उपलब्ध पुरवठा आणि विविध विभागांकडून मिळालेल्या माहितीची केंद्रीय पथकाने दखल घेतली. या माहितीच्या आधारे दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यांना आणि ठिकाणांना भेट द्यायची, याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

  • केंद्रीय पथकातील अधिकारी राज्यातील विविध भागांत जाऊन दुष्काळी परिस्थिती, पिकांचं नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यासाठी विविध पथके तयार करून जास्तीत जास्त क्षेत्राचा आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *