प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरणार

प्रशासनाकडून ठोस उत्तर न मिळाल्याने संघटनेचा आंदोलनाचा इशारा : सिद्धार्थ तेलतुंबडे

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून ते पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती, सेवानिवृत्ती लाभ, रिक्त पदे भरणे तसेच वेतन निश्चिती आदी विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, या मागण्यांवर प्रशासनाकडून समाधानकारक व ठोस उत्तर न मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतीन, असा इशारा संघटनेचे मुख्य सल्लागार सिद्धार्थ तेलतुंबडे यांनी दिला.

बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत वेतन अदा करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अनेकदा वेतनास विलंब होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे वेतनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वेतन देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाभ २० दिवसांत देण्याची मागणी
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशनसह देय देण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेंशन, थकीत रक्कम व इतर लाभ प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक सिंधू रोकडे यांना वेळेवर पेंशन मिळाले नसून त्याचे इतर देय लाभही अद्याप प्रलंबित असल्याचे संघटनेच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले, त्यांचे सर्व प्रलंबित लाभ तातडीने देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच संघटनेकडे प्राप्त झालेल्या निवेदनानुसार गोपाल देशमुख, गीता बकाने, रेखा तायवाडे, श्रीमती कांबळे यांच्यासह सहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध देय लाभ प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांचे देय लाभ तातडीने अदा करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

आकृतीबंधानुसार मंजूर पदांची सेवार्थ व बिंदुनामावली करा
आकृतीबंधानुसार आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक (महिला व पुरुष), आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी आदी संवर्गाच्या लेखाशीर्ष २२१० व २२११ अंतर्गत मंजूर पदांची सेवार्थ व बिंदुनामावली तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा आरोग्य प्रशिक्षण पथक येथे दोन आरोग्य सहाय्यकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच रिक्त असलेल्या आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सहाय्यकाच्या पदावर पात्र कर्मचाऱ्यांना तातडीने पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली.

१०, २०, ३० वर्षांची कालबद्ध पदोन्नती तातडीने द्या
आरोग्य कर्मचाऱ्यांची १०, २० व ३० वर्षांची कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावीत. सन २०२५ मध्ये कालबद्ध पदोन्नती मिळालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकबाकी त्वरित अदा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारणाच्या शिफारसीनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चिती करून त्यानुसार मिळणारा वेतन फरक व थकबाकी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

१२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कनिष्ठ लिपिकांची पद रिक्त
वर्धा जिल्ह्यातील तब्बल १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कनिष्ठ लिपिकांचे पदे रिक्त असल्यामुळे कार्यालयीन कामकाजावर तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेवर परिणाम होत आहे. कनिष्ठ लिपिकांची पदे रिक्त असल्यामुळे वेतन काढण्यास विलंब होत असून त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर होत आहे. त्यामुळे रिक्त असलेली कनिष्ठ लिपिकांची पदे तातडीने भरण्यात यावेत आणि वेतन प्रक्रियेला होणारा विलंब कायमस्वरूपी दूर करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *