पुलगाव-आर्वी-वरूड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे तातडीने पाठवा

पुलगाव-आमला मिलिटरी डेपो जोडणारा हा मार्ग राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा; खासदार अमर काळे रेल्वे विभागाचे बैठकीत मागणी
प्रतिनिधी / दै. प्रतापगडने वारे
वर्धा : नागपूर व भुसावळ मंडळ रेल्वे समितीची माननीय संसद सदस्यांसोबतची महत्वपूर्ण बैठक आज नागपूर येथील विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयात पार पडली. या बैठकीत मध्य रेल्वेच्या मार्गावरील विविध लोकसभा मतदारसंघातील १२ खासदारांनी आपल्या भागातील रेल्वे प्रश्न मांडले. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडत अनेक महत्त्वाच्या मागण्या रेल्वे प्रशासनासमोर ठेवल्या. वर्धा येथे दुर्मेंटो एक्सप्रेसचा थांबा दिल्याबद्दल तसेच देवळी रेल्वे स्थानकावर आरक्षणाची सुविधा सुरू केल्याबद्दल खासदार अमर काळे यांनी रेल्वेचे आभार मानले. त्याचवेळी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.

वर्धा – आर्वी – वरूड ब्रॉडगेज मार्गासाठी जोरदार पाठपुरावा
बैठकीतील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुलगाव-आर्वी-वरूड रेल्वे मार्गाचा ब्रॉडगेजचा प्रश्न. या मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून प्रस्ताव सध्या नागपूर विभागीय रेल्वे कार्यालयात तपासणीसाठी असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मुंबई येथील महाव्यवस्थापकडे आणि त्यानंतर रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. या मार्गाचे महत्त्व स्पष्ट करताना खासदार अमर काळे म्हणाले की, आर्वी-आष्टी-कारंजा परिसर आजही रेल्वे सुविधेपासून मोठ्या प्रमाणात वंचित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागाला रेल्वे जोडणीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे पुलगाव आणि आमला येथे लष्कराचे दारुगोळा भांडार आहेत. प्रस्तावित पुलगाव-आर्वी-वरूड रेल्वे मार्गामुळे या दोन्ही महत्त्वाच्या संरक्षणविषयक केंद्रांना रेल्वेने जोडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक दारुगोळा साहित्याची वाहतूक अधिक सुलभ सुरक्षित आणि वेगवान होऊ शकते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा व सुरक्षित असल्याने त्याला प्राधान्य देऊन काम मार्गी लावावे, अशी ठाम मागणी खासदार अमर काळे यांनी केली.

पुलगाव रेल्वे पुलाचे काम १२ वर्षापासून रखडले
पुलगाव येथील रेल्वे पुलाचा प्रश्नही खासदार अमर काळे यांनी बैठकीत उपस्थित केला. २०१४ मध्ये मंजुरी मिळूनही तब्बल १२ वर्षे उलटल्यानंतरही पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंजूर कामे एवढ्या प्रदीर्घ काळ प्रलंबित राहणे योग्य नसून याबाबत तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. नागपूर-वर्धा, भुसावळ-खंडवा रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर-वर्धा-भुसावळ-खंडवा या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही खासदार अमर काळे यांनी केली. याबाबत रेल्वे विभागाकडून प्रस्ताव विचारधीन असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

वर्धा-कळंब गाडी शेगावपर्यंत वाढविण्याची मागणी
वर्धा येथून सध्या सुरू असलेल्या रेल्वे सेवाचा प्रवाशांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी संबंधित गाडी शेगावपर्यंत वाढविण्याची मागणी खासदार अमर काळे यांनी केली. ही सेवा शेगावपर्यंत वाढविल्यास कळंब, देवळी तसेच यवतमाळ परिसरातील भाविकांना शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होऊ शकते. तसेच शेगावकडील भाविकांनाही या भागात येणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हिंगणघाटच्या बंद झालेल्या रेल्वे थांबांचा प्रश्न ऐरणीवर
कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले. हिंगणघाट येथे पूर्वी १९ गाड्यांना थांबा होता; मात्र सध्या केवळ पाच गाड्यांचे थांबे सुरू करण्यात आले आहेत, उर्वरित गाड्यांचे थांबे अद्याप पूर्ववत करण्यात आले नसल्याकडे खासदार अमर काळे यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच सेवाग्राम आश्रमाच्या नावाने सुरू असलेल्या एक्सप्रेसला सेवाग्राम येथेच थांबा नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *