सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे: जिल्हाधिकारी वान्मथी सी

लेझर लाईट, डीजेचा अतिरिक्त आवाज नको
जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

वर्धा (जिमाका) : येत्या काही दिवसात जिल्ह्यात विविध सण, उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरे केले जाणार आहे. या आनंदाच्या काळात जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, सर्व सण उत्सव शांततेत पार पडेल, यासाठी मंडळांसह सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने शांतता व समन्वय समितीची सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, ‘भारतीय प्रशासनिक सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी शोभिता पाठक तसेच शांतता समितीचे सदस्य, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आगामी सर्व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात यावे. विशेषतः गणेशोत्सव काळात अधिक काळजी घेण्यात यावी. गणेश विसर्जन मार्गातील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा. आवश्यक तेथे रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी. संबंधित भागातील पोलिस अधिकारी ग्रामसेवकांच्या मदतीने मंडळांच्या संपर्कात राहून उत्सव गालबोट न लागता उत्साही वातावरणात पाड पाडण्यासाठी प्रयत्न करावे. या काळात स्वच्छता, मोकाट जनावरे व कुत्रे यांचा उपद्रव किंवा अडथळा होणार नाही, हे पाहावे.

शहरी भागात गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थापन करावे, कुठेही वाहनांची गर्दी होऊन मार्ग अडथळयुक्त होऊ नये. पोलिस विभागाने यादरम्यान पोलिस फिर्याल्या पथकांची कारवाई गतीमान करावी. मंडळाच्या सदस्यांनी परिसरात स्वच्छता, सुव्यवस्था होणार याकडे लक्ष द्यावे. सण, उत्सव काळात अफवा पसरविणे किंवा चुकीच्या गोष्टी कोणी करीत असल्यास मंडळांनी अशा घटनांची प्राथमिक माहिती पोलिस विभागास द्यावी.

माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, यामुळे अनुचित प्रकार टाळण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मिरवणूक काळात डीजेचे आवाज कोणत्याही परिस्थितीत निर्धारित आवाजापेक्षा अधिक असून नये तसेच मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर व रात्री १० वाजतानंतर धनीक्षेपांकाचा वापर मंडळांनी करू नये. डीजे आवाजाबाबत प्रमाणपत्र पोलिस विभागाकडून घेण्यात यावे. डीजेचा आवाज आणि लेझर लाईट मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बाबी असल्याने याबाबतीत कोणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी देखील सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सण, उत्सव आनंदाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्या कृतीमुळे या आनंदाला गालबोट लागता कामा नये, असे सांगितले. सदाशिव वाघमारे, सुरज गोहाड यांनी देखील मार्गदर्शन केले.

यावेळी शांतता समितीचे सदस्य, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी काही विषय मांडले. त्यावर वेळेत कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे यांनी मंडळांनी उत्सव काळात अनुसरण्याच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

महिलांसाठी दामिनी व्हाट्स?प हेल्पलाइन
जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दामिनी व्हाट्स?प हेल्पलाइन सुरू करण्यात आलेल्या आहे. या हेल्पलाइनवर महिला, मुली आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. या हेल्पलाइनच्या पोस्टरचे अनावरण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. सदर हेल्पलाइन क्रमांक ७६२०५२००२५ असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *