वर्धा जिल्ह्याचे पहिले आणि देशातील सर्वात युवा FIDE Arbiter बनले ओजस राऊत

वर्धा : शतरंज अर्थात चेस क्रीडा क्षेत्रात वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्धा जिल्ह्यातील युवा शतरंजपटू तथा शतरंज प्रशासनाशी संबंधित ओजस राऊत यांनी FIDE Arbiter (FA) हा आंतरराष्ट्रीय किताब प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या २१ वर्षे १० दिवसांच्या वयात हा किताब मिळवत ओजस राऊत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशासह ते वर्धा जिल्ह्यातील पहिले Arbiter ठरले आहेत.

FIDE Arbiter हा आंतरराष्ट्रीय शतरंज महासंघ अर्थात FIDE (Fédération Internationale des Échecs) कडून प्रदान केला जाणारा अधिकृत किताब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शतरंज स्पर्धांचे Arbiter नियमानुसार संचालन व निर्णयन, Arbiter रेटिंग प्रणाली, फेअर प्ले तसेच स्पर्धेच्या विविध तांत्रिक बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य या भूमिकेत अपेक्षित असते.

ओजस राऊत मागील काही काळापासून शतरंज क्षेत्रात सक्रिय आहेत. खेळाडू म्हणून शतरंजमध्ये सहभाग नोंदविण्यासोबतच ओजस राऊत यांनी विविध शतरंज स्पर्धांचे आयोजन, व्यवस्थापन आणि प्रशासनामध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे. शतरंज क्षेत्रातील सातत्यपूर्ण सहभाग, अनुभव आणि तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी Arbiter होण्याचा मान मिळवला.

अवघ्या २१ वर्षे १० दिवसांच्या वयात मिळवलेला हा आंतरराष्ट्रीय किताब त्यांच्या कमी वयातील सातत्यपूर्ण कामगिरीचे विशेष उदाहरण मानले जात आहे. खेळाडू म्हणून शतरंज क्षेत्रात योगदान देतानाच स्पर्धा प्रशासन आणि निर्णयनाच्या क्षेत्रातही ओजस राऊत यांनी मिळवलेले हे यश उल्लेखनीय ठरले आहे.

Arbiter म्हणून आता ओजस राऊत यांना Arbiter च्या अधिकृत नियमानुसार शतरंज स्पर्धांच्या संचालन आणि निर्णयनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे. त्यांच्या या यशामुळे वर्धा जिल्ह्यातील शतरंजपटू, प्रशिक्षक आणि युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्धा जिल्ह्यातून प्रथमच FIDE Arbiter निर्माण होणे ही जिल्ह्याच्या शतरंज क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असून, ओजस राऊत यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील युवा शतरंजपटूंना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शतरंजप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ओजस राऊत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *