वर्ध्यात शिवप्रेमी मराठा महासंघ बहुजन समाज आक्रमकवर्धा : धीरेंद्र शास्त्री यांनी महिलांविषयी आणि शिवाजी महाराजा बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. ‘हिंदूंनी चार मुले जन्माला घालावीत आणि त्यातील एक मूल “एए” ला द्यावे’ अशा वक्तव्याबरोबरच महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून विविध सामाजिक, बहुजन आणि शिवप्रेमी संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
याच पार्श्वभूमीवर वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा वक्तव्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली.
वक्त्यांनी सांगितले की, संविधानिक मूल्यांना धक्का देणारी, महिलांचा अपमान करणारी आणि समाजात द्वेष पसरवणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत. अशा प्रवृत्तींवर सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.