सार्वत्रिक व पोटनिवडणुकीबाबत आढावा बैठक
वर्धा (जिमाका) : ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी विविध प्रवर्गाकरिता राखून ठेवावयाच्या जागेची आरक्षण निश्चिती भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निश्चिती करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वत्रिक व पोट निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी वानमथी सी, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी रमा जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, हिंगणघाटचे आकाश अवतारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, आठही तहसिलचे तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत न्यायालयाने आदेश दिल्यास दिवाळीनंतर निवडणुका घेण्यात येईल. यासाठी सर्व संबंधित विभागांनी निवडणुकीसाठी तयारी करावी. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी वर्ग कमी पडत असल्यास इतर विभागातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करावी. आरक्षण निश्चितीबाबत अडचण असल्यास निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घ्यावे, अशा सूचना दिनेश वाघमारे यांनी केल्या.
उपलब्ध असलेल्या ईव्हीएम मशीन सोबतच आयोगाकडे प्राप्त झालेल्या अत्याधुनिक नवीन ईव्हीएम मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवीन मशीनमध्ये बदल असलेल्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुरविण्यात येणाऱ्या मशीनसाठी गोदाम उपलब्ध करून ठेवावे. या गोदामामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फायर सुरक्षा, लाकडी प्लॅटफॉर्मवर लोखंडी रॅकची सुविधा असावी.
बैठकीमध्ये जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतीपैकी सन २०२४ मध्ये ३१५ ग्रामपंचायत, सन २०२५ मध्ये १ ग्रामपंचायती, सन २०२६ मध्ये ५० ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून २ नवनिर्मित ग्रामपंचायती असून अशा एकूण ३६८ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याचे तसेच सदस्याचे आरक्षण निश्चित करताना उद्भवणाऱ्या अडचणी व ५० टक्केच्या मर्यादेत आरक्षण निश्चित झालेल्या ग्रामपंचायती, ५० टक्केच्यावर आरक्षण जात असलेल्या ग्रामपंचायतीची माहिती तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ईव्हीएम मशीनच्या संख्येची माहितीचा तपशिल बैठकीत सांगण्यात आला.