बायो-प्रोम प्रकल्पातून महिला सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल

वर्धा (जिमाका): रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम आणि शेतीच्या खर्चात होणारी वाढ कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील महिलांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ‘माविम’ अंतर्गत स्वयंसिद्धा लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून महिलांनी ‘बायो प्रोम उत्पादन केंद्र’ सुरू करून शेतीला सेंद्रिय पर्याय तर दिलाच, पण स्वतःच्या प्रगतीची नवी वाटही शोधली आहे.

शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देणे हा या प्रकल्पाचा सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक पातळीवर दर्जेदार खत उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार मिळवून देणे या हेतूने या केंद्राची स्थापना करण्यात आली.

सुमारे १ कोटी २७ लक्ष रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पात सुमारे १०० महिला सहभागी झाल्या असून त्यापैकी २० ते २५ महिला थेट उत्पादन, पॅकिंग, विक्री व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. उर्वरित महिला स्वतःच्या शेतात या खताचा वापर करून इतरांसाठी आदर्श ठरत आहेत.

या प्रक्रियेत महिलांना केवळ रोजगारच मिळाला नाही तर त्यांचा आत्मविश्वास, व्यवस्थापन कौशल्य आणि आर्थिक स्वावलंबनही वाढले. यामुळे ग्रामीण महिला केवळ कामगार न राहता खऱ्या अर्थाने ‘उद्योजक’ म्हणून पुढे येऊ लागल्या आहेत. या प्रकल्पामुळे महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला. अनेक महिलांनी घरगुती उत्पन्नात लक्षणीय वाढ केली. काही महिलांनी स्वतःचे लघुउद्योग सुरू करण्याची प्रेरणा घेतली. गावात रोजगारनिर्मिती झाली आणि स्थलांतराचे प्रमाण कमी झाले. ‘बायो-प्रोम’ प्रकल्पाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास यांचा संगम साधला आहे. हा उपक्रम केवळ खतनिर्मितीपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा मार्ग ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *