ग्रामसभेत लाभार्थी यादीला मंजुरी – पराग सोमण
वर्धा (जिमाका) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतीमधील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचे आवास प्लस २०२४ सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत साहाय्यक सर्वेक्षण तसेच स्वयं सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार २३६ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या कुटुंबांच्या मसुदा प्रतीक्षा यादीला ग्रामपंचायत स्तरावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभंमध्ये कायमस्वरूपी मान्यता दिली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सांगितले.
आर्वी तालुक्यातील ५ हजार ८४३ कुटुंब, आष्टी ३ हजार ४६९, देवळी ३ हजार ३६४, हिंगणघाट ४ हजार ९८३, कारंजा ३ हजार ६७०, समुद्रपूर ६ हजार ९३६, सेलू ४ हजार १२३ व वर्धा तालुक्यातील ६ हजार ८४८ कुटुंबाचा सर्वेक्षणात समावेश आहे.
आवास योजनेसाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांकडून काही कुटुंबांची तपासणीही केली आहे. अंतिम प्रक्रियेत पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. बेघर व कच्चे घर तसेच निराधार कुटुंबे, भिक्षेकरी, दिव्यांग, आदिम जमाती समूह आणि कायद्याने मुक्त केलेल्या वेठबिगाऱ्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल, असे पराग सोमण म्हणाले.
बारा निकषांवर अपात्रता
पक्के घर, दोनपेक्षा अधिक खोल्या असलेल्या घरासह विविध बारा निकषांनुसार कुटुंबे वगळली जाणार आहेत.
तीन किंवा चारचाकी वाहन असणारे, यांत्रिकीकरण केलेली तीन किंवा चारचाकी कृषी उपकरणे, ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादेचे किसान क्रेडिट कार्ड, कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी असणे, नोंदणीकृत बिगरकृषी उद्योग असणे, दरमहा १५ हजार रुपयापेक्षा अधिक उत्पन्न, आयकर किंवा व्यावसायिक कर भरणे, २.५ एकर किंवा त्याहून अधिक बागायत जमीन तसेच पाच एकर किंवा त्याहून अधिक जिरायती जमीन असणे, या निकषांचा समावेश आहे, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाड्यावतीने कळविण्यात आले आहे.