प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : आज भारत सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा मांडणारा असून विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. या अर्थसंकल्पात युवक, शेतकरी, महिला, मध्यमवर्ग, स्टार्टअप्स, लघुउद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास यांना प्राधान्य देण्यात आले आहे, असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर, देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, ‘हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा नाही, तर सामान्य नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि जिल्हास्तरावर पायाभूत सुविधा मजबूत करणे यासाठी केंद्र सरकारने भक्कम तरतुदी केल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी या तरतुदींचा प्रभावीपणे उपयोग केला जाईल.’
भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करताना म्हटले की, ‘हा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताची मजबूत पायाभरणी आहे. मध्यमवर्गाला दिलासा, उद्योजकांना संधी आणि युवकांना भविष्याची दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. वर्धा जिल्ह्यातील उद्योग, शिक्षण आणि कौशल्य विकासाला यामुळे मोठी चालना मिळेल.’
देवळी-पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी ग्रामीण व पायाभूत विकासावर भर देताना सांगितले की, ‘ग्रामीण भाग, रस्ते, सिंचन, आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी देवळी-पुलगाव मतदारसंघासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शेतकरी व युवक केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे.’
एकूणच, केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प देशाचा वेगवान, समावेशक आणि संतुलित विकास साधणारा असून वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नवी दिशा देणारा असल्याचा विश्वास भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आला.