प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारेसेलू: तालुक्यातीलवाहितपूरगावात सोमवारी ता १० ला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अज्ञात इसमाद्वारे गावात बिरसा मुंडा यांचा पुतळा उभा केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गावात १५ पोलिसांचा मोठा ताफा आणि चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सोमवारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस होता. याच दिवशी गावात अज्ञात व्यक्तीने बिरसा मुंडा यांचा पुतळा उभा केला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकत्र येत गावातील कायदा व सुव्यवस्था तसेच इतर सामाजिक मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहितपूर गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची खुली विक्री सुरू आहे. स्वतः येथील पोलीस पाटील चा पुतण्या ही दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या अवैध धंद्यामुळे गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून काहींनी या व्यसनापायी आपला जीव सुद्धा गमावला आहे. यामुळे गावात सामाजिक स्वास्थ्यबिघडत चालले आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात अनेकदा संबंधित प्रशासनाकडे व पोलिसांकडे अधिकृत तक्रारी दाखल केल्या असल्याचे म्हणणे आहे. मात्र, वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाही, असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला आहे. ‘आम्ही तक्रार करूनही पोलीस कधीही फिरकत नाहीत व कारवाई सुद्धा करीत नाही.अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मात्र पुतळा उभा होताच १५ पोलिसांचा ताफा दाखल झाला. दरम्यान, आज एका कारणावरून प्रशासनाने तातडीने हालचाली करत वाहितपूर गावात तब्बल १५ पोलिसांचा मोठा बंदोबस्त व ताफा मागवून घेतला. गावात थिकठिकाणी पोलिसांचे पहारे लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीच्या गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस प्रशासनाने अशा कारणावरून थेट पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या गावात परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता असून, या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.