प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा: चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी अतुल अशोकराव इंगळे वय ३६ वर्षे यांनी शेतीच्या कर्जाच्या ओझ्यामुळे व शेतात होत असलेल्या सततच्या नापिकीच्या संकटाला कंटाळून आत्महत्या केली. सदर बाब खासदार अमर काळे यांच्या कानावर जाताच त्यांनी घुईखेड त. चांदूर रेल्वे येथील आपल्या दौऱ्यातून वेळ काढून निमगाव येथे अतुल इंगळे यांचे घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. खासदार अमर काळे यांनी इंगळे यांच्या कुटुंबातील प्रत्येकाशी व्यक्तीश: चर्चा करून त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून त्यांना सांत्वनाद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
अतुल इंगळे यांना दोन मुली, म्हातारे आई-वडील व बहीण असून कुटुंबाचा संपूर्ण गाडा हा शेतीवरच अवलंबून आहे. सततची नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव, उत्पादन खर्चावर आधारित पिकाला भाव मिळत नसल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड सुद्धा शेतीतून करता येत नाही. तसेच यावर्षी झालेली अतिवृष्टी व नापिकी यामुळे कुटुंबाच्या दैनंदिन गरजा व शेतीच्या उचललेल्या खाजगी बँकांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी सततचा तगादा या सर्व गोष्टींना कंटाळून अतुल इंगळे यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले.
भारतात शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. परंतु हल्लीच्या काळात हा शब्दप्रयोग कागदावर लिहिणे व वाचण्यापुरताच याचे महत्त्व आहे. प्रत्यक्षात वास्तविकता वेगळीच आहे, अशी खंत खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली. शेतकरी कर्जाच्या ओझ्यापायी अतिवृष्टीने कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यापोटी मुलांचे शिक्षण या विवंचनेतूनच आत्महत्येसारखे विचार शेतकऱ्यांच्या मनात येतात. एवढ्या शेतकरी आत्महत्या होत असताना सुद्धा सरकार मात्र तुटपुंजी मदत ज्यातून शेतकरी कुटुंबाचा एक महिन्याचा खर्च सुद्धा भागविला जाऊ शकत नाही, एवढी अल्पशी मदत केवळ घोषित केली.
यावेळी खासदार अमर काळे यांच्या सोबत चांदूर रेल्वे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.