गांधी पुतळ्याजवळ करण्यात आले धरणे आंदोलन, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि NEET तसेच TET परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), वर्धा जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये गैरप्रकार, पेपरफुटी, निकालातील अनियमितता आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन NEET व TET सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी करतात. मात्र, परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेतील विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास कायम ठेवणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने म्हटले आहे.
दिल्लीत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत संघटनेने महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. NEET व TET परीक्षांशी संबंधित गैरप्रकारांची निष्पक्ष व वेळेत चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करून त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर कदम, संदिप किटे, प्रविण पेठे, यांच्यासह धनराज तेलंग, संजय काकडे, पराग चोपे, प्रकाश जिंदे, राजु वाघमारे, मुजिद शेख, आकाश तळवेकर, विठ्ठल उईके, शुभम निमजे सह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.