साहेब सांगाना आम्ही शेती करायची तरी कशी?

बोरधरण परिसरातील शेतकऱ्यांवर ‘कॅटरिना’ वाघिणीचे सावट
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पेरण्या रखडल्या

सेलू : तालुक्यातील निसर्गसंपन्न आणि पर्यटकांना भुरळ घालणारे बोरधरण व सालई (पेवठ) परिसरातील शेतकरी सध्या एका मोठ्या संकटात सापडले आहेत. व्याघ्र प्रकल्पातील ‘कॅटरिना’ नावाची वाघीण आपल्या शावकासह वारंवार मानवी वस्तीत आणि शेतशिवारात मुक्त संचार करत असल्याने, शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. हाताशी आलेल्या पेरणीच्या हंगामात जीवाच्या भीतीनी शेतकऱ्यांनी अजून उन्हाळवाही सुद्धा केलेली नाही. बोरधरण हे व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याने येथे वन्यप्राण्यांचा वावर असणे स्वाभाविक असले तरी, अलीकडच्या काळात कॅटरिना वाघिणीने आपली दहशत निर्माण केली आहे. दोन दिवसांपूर्वीच या वाघिणीने काही मोठ्या शिकार केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. शेतात सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही वाघीण आणि बच्छड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भयावह परिस्थितीमुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर मजुरांनीही शेतीकामावर जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. एकीकडे निसर्गाची अनिश्चितता आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर असताना, आता वन्यप्राण्यांच्या या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर ‘शेती करायची कशी?’ असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. या गंभीर परिस्थितीकडे वनविभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर यंदा शेती पडीक ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय उरणार नाही.

‘आम्ही सर्वांची भूक भागवण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो, पण आमच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची?’ असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. दरवर्षी निसर्गाच्या कोपाचा आणि आर्थिक संकटाचा सामना करणारा शेतकरी आता या वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे हतबल झाला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून, वनविभागाने तातडीने या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता ‘मायबाप’ सरकार आणि वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकरी पुन्हा आणखी एकदा कर्जाच्या विळख्यात दबला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *