पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते नमो उद्यानचे भूमीपूजन:जिल्ह्यात होणार १० नमो उद्यान

वर्धा (जिमाका) : राज्य शासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो उद्यान संकल्पनेतंर्गत राज्यात ४०० नमो उद्यान तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक नगर पालिकांना निधी सुध्दा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात १० नमो उद्यान तयार करण्यात येणार असून वर्धा नगर परिषद क्षेत्रातील इसाजी ले-आऊट मध्ये तयार करण्यात येणाऱ्या या उद्यानाचे भूमीपूजन आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

भूमीपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, मुख्याधिकारी विजय देशमुख, पी.व्ही टेक्स्टाईलचे महाव्यवस्थापक भूपेंद्र शहाणे, नगर परिषदेच्या बांधकाम सभापती राखी पांडे, नगर सेवक वंदना चामटकर, सोहनसिंह ठाकूर, नगर परिषदेचे नगर सेवक व माजी नगर सेवक यांची उपस्थिती होती.

संपूर्ण राज्यात तयार करण्यात येणारे नमो उद्यान हे वैशिष्टपूर्ण असणार असून पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संपूर्ण कलात्मक असणार आहे. वृद्धांपासून बालकांपर्यंत सर्वांसाठीच उद्यानामध्ये सुविधा निर्माण करुन देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक नमो उद्यानाकरीता १ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातून उत्कृष्ट तयार होणाऱ्या नमो उद्यानाला राज्य शासनाच्यावतीने ५ कोटी रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. यासाठी नगर पालिकेने नगर सेवक, परिसरातील नागरिकांची समिती तयार करुन नमो उद्यानाचे नियोजन करावे व राज्यात या उद्यानाचा पहिला क्रमांक येण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

वर्धा नगर परिषद क्षेत्रात असलेल्या उद्यानाचे सौंदर्यीकरण टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारी घ्यावी. वर्धा शहरातील बाबासाहेबांच्या पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी नगर पालिकेने समिती गठीत करुन नियोजन करावे, अशा सुचना यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.

उद्यानाची निर्मित करत असतांना देखभाल तेवढीच महत्वाची आहे. यासाठी प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजून काम करावे. शहराचे प्रदुषण कमी करण्यासाठी तसेच शहर हिरवेगार करण्याकरीता नगरपरिषदेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ म्हणाले.

यावेळी संजय गाते, राखी पांडे, भूपेंद्र शहाणे यांची देखील भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संदीप चिचाटे यांनी केले. कार्यक्रमाला नगर सेवक, माजी नगर सेवक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *