सेवाग्राम-हमदापूर-कांढळी महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा

तसेच इतर रस्त्यांची अपुर्ण रस्ते तात्काळ पुर्ण करा : खासदार अमर काळे यांची मागणी

वर्धा : सेवाग्राम-हमदापूर-कांढळी हा सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. सदर रस्त्यावरील पुलांची कामे अजूनही अपूर्ण असून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाने बनविला असून या मार्गावर बऱ्याच ठिकाणी भेगा पडल्या आहेत. ह्या भेगा जवळपास ४.४ इंचाच्या असून या रस्त्यावरून मोटर सायकलने जाणाऱ्या प्रवासांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. ह्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात या रस्त्यावर झाले आहे. अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही विभागाने दखल न घेतल्याने शेवटी नागरिकांनी खासदार अमर काळे यांचेकडे धाव घेतली व रस्ता दुरुस्तीची मागणी केली.

खासदार अमर काळे यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाला संपर्क साधून या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात जी रस्त्याची कामे रखडली आहेत, अपूर्ण आहेत ती तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच बरेच ठिकाणी वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांना न केलेल्या कामाचे भुगतान केले आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अभियंत्यावर कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा खासदार अमर काळे यांनी या प्रकरणी केली आहे. तसेच ज्या ठेकेदारांनी अशा पद्धतीचे काम न करताच बिले उचलली त्या ठेकेदाराकडून व सदर रक्कम वसुल करून त्या ठेकेदारांवर कार्यवाही करण्याची मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *