प्रतिनिधी / दै. जन-संग्रामवर्धा : खरीप हंगामाला सुरुवात होत असून शेतकरी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. पिक कर्जासाठी बँक शाखेत अर्ज केल्यानंतर सदर अर्ज मुख्य शाखेत मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्ज प्रकरणे मंजूर होण्यास बराच वेळ जातो. परिणामी पेरणीला सुरुवात होऊन जाते. यासाठी बँकांनी समन्वयाची भूमिका बजावून पिक कर्जाची प्रकरणे तात्काळ मंजूर करावी. पिक कर्जाचे १०० टक्के वितरण करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सूचना केल्या. बैठकीला खासदार अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर आदी उपस्थित होते.
मागील वर्षी ८८७ कोटी ४८ लाख रुपयांचे पिक कर्जाचे वाटप करण्यात आले. यावर्षी देण्यात आलेले पिक कर्जाचे १०० टक्के लक्षांक पूर्ण होईल, असे बँकांनी नियोजन करावे. प्रधानमंत्री सौर कृषि पंप योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या सौर पंपांमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने जिल्हा व तालुका तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत केवळ शेतकऱ्यांना मदत देण्यात येत होती. शासनाने यामध्ये बदल करून शेतमजुरांचा समावेश केला आहे. याची ग्रामीण भागात कृषि विभागांनी जनजागृती करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारण, जलयुक्त शिवारमधील कामांचे प्राधान्य ठरवून ती पूर्ण करण्यात यावीत. तसेच शेतकऱ्यांवर दुभारी पेरणीचे संकट येऊ नये यासाठी गावस्तरावर बैठका घेऊन शेतीचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशाही सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्यात.
यावर्षी जिल्ह्यात धान, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, भुईमूग, कापूस या पिकांसाठी ४ लाख १८ हजार ९७५ हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून ८७ हजार १८४ क्विंटल बियाणे मागणीचे नियोजन करण्यात आले आहे. खतासाठी १ लाख १७ हजार ९०० मेट्रीक टन खताची मागणी असून एप्रिल अखेर पर्यंत ५९ हजार १८९ मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे, असे अरविंद उपरीकर यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी खासदार अमर काळे यांनी खत वितरीत करण्यासाठी वर्धा व हिंगणघाट रॅक पॉईंट असल्याने काही तालुक्यात खत पुरवठ्याला विलंब होत असतो, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. आ. दादाराव केचे यांनी बोगस बियाणे विक्री करण्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे. पीएम किसान निधी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले तर आ. समीर कुणावार यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण यावर मार्गदर्शनासाठी तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करावे, असे ते म्हणाले. आ. राजेश बकाने यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीला सतर्क राहून तसे नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी, कृषि निविष्ठा दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा व शेतकऱ्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.