प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : वर्धा जिल्ह्यात नुकताच झालेला अकाली पाऊसमुळे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी विशेषतः आष्टी तालुक्यात संत्रा व मोसंबी पिकांचे नुकसान झालेले आहे. काही शेतकऱ्यांचे तुरीच्या गंजी शेतात होत्या तर काही संत्रा व मोसंबीचे पिक मोठ्या जोमात आले होते.
परंतु झालेल्या गारपिटीत संपूर्ण संत्रा व मोसंबी खाली गळून पडली असून झाडाला असलेली संत्रा व मोसंबी गारपिटीच्या तडाख्याने मार लागून सडला आहे. सततच्या नापिकी व भावाने हताश झालेल्या शेतकऱ्याला या फळवर्गीय पिकाच्या उत्पन्नातून काहीतरी मिळेल या आशेने शेतकरी असतानाच अचानक जिल्ह्यात वादळी पाऊस व त्यातही काही भागात गारपीट झाले व पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास झालेल्या अकाली पाऊस व गारपिटीने हिरावून घ्यायचे काम केले.
विशेषतः आष्टी भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे संत्रा व मोसंबीचे पिक जमिनदोस्त झाले तर झाडाला असलेली फळे गाराच्या माराने सडली आहेत. शेतकरी वर्षभर शेतात काबाडकष्ट करतो व केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून हातातोंडाशी आलेले पिक व आलेले पिक बाजारात विकून काहीतरी पदरात पडेल या आनंदात असतानाच हा अकाली पाऊस शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. पुन्हा एकदा शेतकरी रडकुंडीला आला. या सर्व प्रकरणांची खासदार अमर शरदराव काळे यांनी कृषी विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानीचा अंदाज घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले.