राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ द्या : खासदार अमर काळे

पंतप्रधानांना पत्राद्वारे केली मागणी : संसदेत आवाज उठवणार
वर्धा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, यासाठी वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळेपर्यंत मी संसदेत सातत्याने आवाज उठवणार, अशी ग्वाही त्यांनी दिली असून, या भूमिकेमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

खासदार काळे यांनी पत्रात नमूद केले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ संत नव्हते, तर स्वातंत्र्यलढ्यात जनमानसाला प्रेरणा देणारे महान समाजप्रबोधक होते. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात आष्टी व चिमूर येथे उसळलेल्या उठावामागे त्यांच्या विचारांची ठिणगी होती. त्यांच्या कीर्तनातून, संदेशातून सामान्य माणसाच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटली आणि ब्रिटिश सत्तेविरोधात उभे राहण्याचे धैर्य जनतेत निर्माण झाले.

ज्या भूमीवर राष्ट्रसंतांनी वास्तव्य केले, त्या भूमीत आपण राहतो, हेच आपले भाग्य आहे. त्यांच्या विचारांची पूजा केवळ शब्दांत नको, तर कृतीतून व्हायला हवी, असे सांगत त्यांनी राष्ट्रसंतांच्या कार्याचा गौरव केला.

राष्ट्रसंतांना ‘भारतरत्न’ मिळणे हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, देशभक्तीच्या महान परंपरेचा गौरव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारने या मागणीची दखल घ्यावी, यासाठी संसदेत सातत्याने पाठपुरावा करणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *