दीड वर्षापूर्वीची दुचाकी चोरी उघड; अट्टल गुन्हेगार वर्धा पोलिसांच्या जाळ्यात

वर्धा : शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने (DB Pathak) अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवत, दीड वर्षापूर्वी चोरीला गेलेली मोपेड दुचाकी शोधून काढली आहे. या प्रकरणी यवतमाळ कारागृहात जेरबंद असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी राजेश महादेवराव घोडे (५४, रा. भीम नगर, वर्धा) यांनी त्यांची मोपेड ॲक्टीव्हा (क्र. एम एच ३२ ऊ ४३३३) बजाज चौक परिसरातील मोहता जिन येथे राहत्या घराच्या अंगणात उभी केली होती. २२ नोव्हेंबर २०२४ च्या रात्री अज्ञात चोरट्याने ही ४५,००० रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १९७५/२०२४, कलम ३०३ (२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस हवालदार प्रशांत वंजारी यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर गाडी यवतमाळ येथील शुभम धोंगडे याच्याकडे आहे. पोलिसांनी तात्काळ यवतमाळ येथे जाऊन ती गाडी जप्त केली. शुभमची चौकशी केली असता, त्याने ही गाडी सतीश उर्फ शेंबड्या उर्फ मुंगश्या बाबाराव मडावी (२५, रा. राळेगाव, जि. यवतमाळ) याच्याकडून २५,००० रुपयांत विकत घेतल्याचे सांगितले. सतीशने ‘वडील दवाखान्यात भरती आहेत’ असे खोटे कारण सांगून ही गाडी विकली होती.

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, मुख्य आरोपी सतीश मडावी हा सध्या यवतमाळ जिल्हा कारागृहात एमपीडीए (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध आहे. वर्धा जिल्ह्यात त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचे ८ गुन्हे दाखल असून यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरी व घरफोडीचे सुमारे ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गृहविभागाच्या परवानगीनंतर, वर्धा पोलिसांनी आरोपीचा ताबा घेऊन त्याला रीतसर अटक केली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष ताले, पोनि विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे करण्यात आली. या पथकात पोउपनि शरद गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, अमोल आतराम, वैभव जाधव, श्रावण पवार आणि शशिकांत मुंडे यांचा समावेश होता.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *