जुन्याच टाक्यांवर उभारले नवीन संडासप्रतिनिधी/ अभय वेदमोहता,सेलु : मांडगाव येथील शौचालय घोटाळा उघडकीस आणणाऱ्या ग्रामीण पत्रकारांचे कौतुक होत असतानाच, आता सिंदी नगरपरिषदेतील प्रशासकीय काळातील कारभारही चव्हाट्यावर आला आहे. येथील शौचालय बांधकामात १९ ते २२ लाख रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप समाजसेवक सुधाकर वाघमारे यांनी केला असून, जुन्या गडर टाक्यांचा वापर करून नवीन बांधकामे उरकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदी नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट असताना शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. निविदेतील अटींनुसार, प्रत्येक शौचालयासाठी स्वतंत्र नवीन गडर टाकी बांधणे अनिवार्य होते. मात्र, बस स्थानक परिसर वगळता इतर अनेक ठिकाणी कंत्राटदार आणि प्रशासनाने संगनमत करून जुने संडास पाडले, पण त्यांच्या जुन्या टाक्या कायम ठेवल्या. त्यावर केवळ डागडुजी करून नवीन शौचालये उभी करण्यात आली. तब्बल १९ ते २२ लाख रुपये खर्चून झालेल्या या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची तक्रार करूनही अधिकारी ढिम्म हलत नसल्याचे चित्र आहे. समाजसेवक सुधाकर वाघमारे यांनी माहिती अधिकारांतर्गत या कामाचा तपशील मागितला असता, प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, जबाबदार पदावर असलेले अधिकारी आपली शैक्षणिक अर्हता आणि नियमांना बगल देऊन माहिती दडवत असल्याचे वाघमारे यांचा आरोप आहे.
सिंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे समुद्रपूरचा देखील अतिरिक्त कार्यभार असल्याने ते सिंदी येथे पूर्णवेळ उपलब्ध राहत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे अपेक्षित असताना, ते कुटुंबासह येथे राहत नसल्याने प्रशासकीय शिस्त पूर्णपणे कोलमडली आहे. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही बोंबाबोंब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘एका घराच्या किमती एवढी रक्कम शौचालय बांधकामावर खर्च होऊनही जर जुन्या टाक्या वापरल्या जात असतील, तर हा जनतेच्या टॅक्सचा सरळ अपमान आहे. अधिकाऱ्यांना दिवसाला ३ ते ४ हजार रुपये पगार दिला जातो, पण कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत ही लूट थांबणार नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया सुधाकर वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे सिंदीवासीयांचे लक्ष लागले आहे.