बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ बेपत्ता; अधिकाऱ्यांचे कानावर हात; खासदार अमर काळे यांनी घेतली दखल

वर्धा : जिल्ह्यात सेलू व आर्वी तालुक्याचा काही भाग मिळून बोर व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला असून या व्याघ्र प्रकल्पातील युवराज, बाजीराव व शिवाजी नामक वाघ बेपत्ता असून याबाबत अधिकाऱ्यांना माहितीच नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हे तिन्ही वाघ बेपत्ता असून अधिकारी मात्र यांचे विषयी काहीही बोलायला तयार नाही किंवा त्यांना काय झाले याची माहितीच नाही. सदर बाब काही व्यक्तींनी खासदार अमर काळे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर खासदार अमर काळे यांनी तातडीने या बाबींची दखल घेऊन राज्याचे वनमंत्री यांना पत्र लिहून याबाबत तात्काळ चौकशी करण्याची विनंती केली.

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प हा सेलू, आर्वी, कारंजा व हिंगणा भागात व्यापला असून याचा अधिकतर भाग सेलू व आर्वी तालुक्यात येतो. या व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, चित्तळ, हरीण, रानकुत्रे, गवा, मोर इतकेच नाही तर विविध जातींचे पक्षी या जंगलात आढळतात. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या लागूनच बोर पाटबंधारे प्रकल्प असल्याने पाण्याच्या उपलब्धतेमुळे या धरणाच्या काठावर नेहमीच या प्राण्यांचा वावर असतो. या जंगलात विविध जातींच्या वनस्पती सुद्धा प्रकर्षाने आढळून येतात. अशा या वनस्पतीने समृद्ध असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात युवराज, बाजीराव, कॅटरीना, शिवाजी, अंबिका, पिंकी नामक नर-मादी वाघांचे वास्तव्य होते. खासदार महोदयांकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार युवराज हा गेल्या कित्येक वर्षांपासून बेपत्ता आहे.

बाजीरावचा २०१७ मध्ये मृत्यू झाला व शिवाजी नामक वाघ सुद्धा गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता आहे. वनविभागाला याची जरा सुद्धा कल्पना नाही. इतकेच नाही तर वनविभाग इतका बेफिकीरपणे काम करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वाघांबाबत त्यांना साधी बेपत्ता असल्याची सुद्धा माहिती नाही. जंगलात बोर व्याघ्र प्रकल्पात होत असलेली अवैध वृक्षतोड, बोर व्याघ्र प्रकल्पातून बांधकाम विभागाद्वारे विना परवानगी सिमेंट/डांबरी रस्त्याची होत असलेली कामे, याबाबीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतांना व्याघ्र प्रकल्पात होत असलेली अवैध बांधकामे या विषयी सुद्धा वनविभाग अनभिज्ञ आहे. सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडतो की, वनविभाग नेमका करतो तरी काय?

सदर बाब काही सुज्ञ नागरिकांनी खासदार अमर काळे यांच्या लक्षात आणून दिली. खासदार अमर काळे यांनी विना परवानगी होत असलेल्या रस्त्याच्या बांधकामाची व केलेल्या अवैध वृक्षतोडीची पाहणी सुद्धा केली, इतकेच नाही तर विना परवानगी व्याघ्र प्रकल्पात होत असलेल्या रस्त्यावरील आर.सी.सी. कामावरील सुद्धा पाहणी केली. त्यावेळी ही कामे वनविभागाची परवानगी नसताना बिनबोभाटपणे एम.एस.आय.डी.सी. चे कंत्राटदार करत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने या बाबीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांना पत्र लिहून वनविभागातील बोर व्याघ्र प्रकल्पात चालू असलेल्या अंदाधुंदी कारभाराची वरिष्ठ स्तरीय चौकशी करावी अशी विनंती केली. त्यामुळे वनविभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून वनविभाग आता चातूरमातुर सारवासारव करण्याच्या प्रयत्नात आहे. खासदार अमर काळे यांनी दिलेल्या पत्रामध्ये वनविभागाची या अवैध कारभाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर धडक कार्यवाही करण्याबाबत ही विनंती राज्य वनमंत्री यांचेकडे केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *