वर्धा शहराच्या चारही बाजूने अवैध डिझेल तस्करी

प्रशासनाचे दुर्लक्ष, यांना आशिर्वाद कुणाचा चर्चेला उधाण
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : जिल्ह्यात अवैध डिझेल, पेट्रोल तस्करीचे रॅकेट सक्रीय असून प्रशासन शहराच्या चारही बाजूने हा तस्करीचा व्यवसाय राजरोसपणे चालू आहे. परंतु प्रशासन मात्र मुग गिळून असल्याने या माफियांविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे या अवैध डिझेल, पेट्रोल तस्करीला राजकीय पाठबळ तर नाही ना, या चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्धा-समुद्रपूर मार्गावरील करंजी-काजी येथील एका ढाब्यावर ग्रामीणांच्या समक्ष अवैध डिझेल पेट्रोल तस्करीचा व्यवसाय चालू आहे.

हे कार्यक्षेत्र सेवाग्राम पोलिस स्टेशन क्षेत्रात येत असून पोलिस प्रशासनही कारवाई करण्यात असमर्थ आहे. तर वर्धा पुलगांव मार्गावर हाच अवैध डिझेल, पेट्रोल तस्करीचा व्यवसाय राजरोसपणे चालू आहे. तर वर्धा-नागपूर महामार्गावरील केळझर येथील एका ढाब्यावर हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून चालू असून या व्यवसायात अनेक पांढरपेशे सहभागी असल्याचे वृत्त आहे. तर तुळजापूर-नागपूर महामार्गावर सेलूजवळ पुलाखाली पुलाचा आडोसा घेवून दिवसाढवळ्या निमगांव येथील नायरा प्रकल्पातून भरवून निघालेल्या टँकरमधून डिझेल, पेट्रोलची तस्करी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा कार्यालय आणि पोलिस प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. या अवैध डिझेल, पेट्रोल गोष्टीत स्वतःला प्रतिष्ठित समजले जाणारे अनेक जण सहभागी असल्याचे चित्र आहे. तस्करी करणारे मात्र आमचं कोणीच काही करु शकत नाही. या तोऱ्यात जिल्ह्यात हा धंदा करीत आहे. यापूर्वी पोलिस प्रशासनाने कारवाई करत अवैध डिझेल, पेट्रोल, तस्करीवर धाड टाकली होती. परंतु पुन्हा नविन जोमाने हे काम जिल्ह्यात चालू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *