प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकार- निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ आजपासून बेमुदत संपावर गेले असून सामान्य नागरिकांचे अनेक कामकाज विस्कळीत झाले आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मचारी संघटनाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत आंदोलन चालूच राहील. असा इशारा देण्यात आला. तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना अनेकदा विनंती करुनही त्यांनी चर्चेसाठी वेळ दिला नाही. त्यामुळे हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात विविध शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळामध्ये राज्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मराठवाडा शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन या तीन संघटना संलग्न आहेत. त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सरचिटणीस माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये सरसकट सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्याच्या सक्तीची अट रद्द करणे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करणे, संचमान्यता २०२५-२६ नुसार अतिरिक्त ठरलेले शिक्षक, शून्य शिक्षकी झालेल्या शाळा, विद्यार्थी याबाबत शासनाचे स्वंयस्पष्ट धोरण, १०-२०-३० ची सेवांतर्गत प्रगती योजना शिक्षकांना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे असणे आदी मागण्यांचा समावेश आहे. यात अनेक संघटनांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात आले.