प्रतिनिधी / दै.प्रतापगढे वारे वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरातील एक वाघीण तीन पिले आणि एक वाघ अशा ५ वाघांनी गेल्या ११ महिन्यापासून शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केले असून आतापर्यंत या वाघांनी अनेक पाळीव जनावरांना ठार केले आहे. या वाघाचा बंदोबस्त व वनव्यवस्थापन, वन्यजीव सुरक्षाविषयक प्रश्न आणि विकासकामांवरील अडथळे याबाबत उपाययोजना करण्यासाठी आमदार समीरभाऊ कुणावार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक लावण्याची विनंती केली होती.
यावर १० डिसेंबरला नागपूर येथील सेमिनरी हिल परिसरातील हरीसिंग सभागृहात ४ वाजता बैठक घेण्यात आली या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, आमदार समीरभाऊ कुणावार यांसह बैठकीस मा. अपर मुख्य सचिव, वन विभाग, मंत्रालय, मुंबई, मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), म. रा. नागपूर, मा. प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव), म. रा. नागपूर, मा. वनसंरक्षक, नागपूर, मा. उप वनसंरक्षक, वर्धा. तसेच वन विभागाच्या संबंधित अधिकारी, स्थानिक प्रशासन उपस्थित होते.
या बैठकीत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील वनव्यवस्थापन, वन्यजीव सुरक्षाविषयक प्रश्न आणि विकासकामांवरील अडथळे याबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे.
या वाघांना जेरबंद करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केले होते. सोबतच वनमंत्री गणेश नाईक यांना सुद्धा फोनवर अवगत करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. यावेळी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आमदार समीर कुणावार यांनी तालिकाध्यक्ष पदवरून वनमंत्री गणेश नाईक यांना भिडघाटसह वाघाच्या बंदोबस्तासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका लावून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.
यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी पहिलीच बैठक हिंगणघाट विधानसभा क्षेत्रासाठी लावली हे विशेष. या बैठकीत संपूर्ण चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, वनक्षेत्रातील विकासकामांना चालना आणि नागरिक वन्यजीव सहजीवन सुरक्षित करण्याबाबत एकमताने उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत. ही बैठक हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील जनतेसाठी आशेचा किरण ठरली असून, पुढील काळात या सर्व निर्णयामुळे जनजीवनात निश्चितच सकारात्मक बदल पडणार आहे असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले आहे.