हिंगणघाट : राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांची आमदार रोहित पवार, अतुल वांदिले यांनी भेट घेऊन सिंदी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याकरिता सकारात्मक चर्चा केली.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी-रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, ही मागणी कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नेते आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून घेतलेली अत्यंत आक्रमक भूमिका आणि वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी शासनदरबारी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे राज्य सरकारने या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची अधिकृत घोषणा केली होती.
सिंदी-रेल्वे परिसरातील आरोग्य सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेले ऐतिहासिक ‘रक्ताने पत्र’ आंदोलन यशस्वी करण्यासाठी अमोल सोनटक्के व आशिष देवतळे यांनी दिलेले योगदान अत्यंत उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वात आणि नियोजनात १५०० पेक्षा जास्त नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. या आंदोलनाचे गांभीर्य ओळखून जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी स्वतः त्या पत्रावर रक्ताने स्वाक्षरी करून या लढ्याला नवी धार दिली होती. त्यांच्या या ठोस भूमिकेमुळे आणि अतुल वांदिले यांच्या निग्रही पाठपुराव्यामुळे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तातडीने दखल घेत श्रेणीवर्धनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही सभागृहात दिली होती.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांची आमदार रोहित पवार, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी भेट घेऊन सिंदी-रेल्वेच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत जोरदारपणे मांडून प्रशासकीय दिरंगाईवर सकारात्मक चर्चा केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे, अमोल सोनटक्के, नगरसेवक आशिष सोनटक्के उपस्थित होते.