एमएसआरडीसी व बांधकाम विभागाचा आढावा
कोतवालांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार
वर्धा (जिमाका): जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ता तयार करताना चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होण्यासोबतच विहित कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात एमएसआरडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामाचा आढावा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी खासदार सुरेश वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंता ऋतुजा बंजारी, सुनिल गफाट, प्रोजेक्ट मॅनेजर, कंत्राटदारांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
एमएसआरडीसीच्या पॅकेज अंतर्गत जिल्ह्यात पाच रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये मुख्यत्वे हिंगणी ते आंजी व हिंगणी, वडगाव ते झडशी या रस्त्यांबाबत संथगतीने काम सुरू असल्याच्या नागरिकांच्या विविध तक्रारी आहेत. रस्त्यांचे काम कालमर्यादेत पूर्ण होईल, याबाबत खातरजमा करा. एका बाजूचा रस्त्याचे पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या बाजूने खोदकाम करू नये. रस्त्यांचे काम सुरू असताना दिशादर्शक फलक, बॅरीकेट आदी लावण्यात यावे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी दिल्या.
कंत्राटदारांविरोधात नागरिकांची तक्रार असल्यास त्याची चौकशी पूर्ण केल्याशिवाय देयके अदा करण्यात येऊ नये. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या गोपुरी चौकापर्यंतचा रस्ता, पिपरी ते उमरी रस्ता तातडीने पूर्ण करावा. सेलू न्यायालयाची इमारत, तहसील कार्यालय आदी कामांच्या प्रशासकीय बाबी पूर्ण कराव्यात. पुलांच्या देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी करावी, अशा सूचना देखील पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.