वर्धा (जिमाका): यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यादरम्यान आजनसरा येथे वर्धा नदीवर बांधण्यात येणाऱ्या मोठ्या पुलावर दोन जिल्ह्यातील भाविकांना सुविधा निर्माण होईल. यामुळे अंतर कमी होण्यासोबतच भाविक व नागरिकांचा वेळ, इंधन व श्रमामध्ये मोठी बचत होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय रस्ते निधी योजनेतून यवतमाळ आणि वर्धा दरम्यान आजनसरा येथे वर्धा नदीवर २७५ मीटर लांबीचा ३८ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या मोठ्या पुलाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे तसेच संजय गाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक मुख्य अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते.
आजनसरा येथील पुलामुळे यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांना श्रीक्षेत्र आजनसरा येथे दर्शनासाठी पोहणामार्गे येणाऱ्यांकरिता २० किमी व शिरसगाव मार्गे येणाऱ्यांकरिता ३० किमीचे अंतर कमी होणार आहे.
सन २०१४ पासून महामार्गावरील रस्ते, पूल, अपघात प्रवण स्थळ रस्ते बांधकामाची जिल्ह्यात १० हजार कोटीची कामे करण्यात आली असून मागील वर्षात ४०० कोटीची कामे मंजूर करण्यात आली आहे. कामामुळे रस्त्यावरील अपघाताच्या प्रमाणात घट झालेली आहे. तसेच रस्त्यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळत आहे, असे पुढे बोलतांनी श्री. गडकरी म्हणाले.
स्वर्गीय भगवानजी आंबटकर यांचे या परिसराच्या विकासात मोठे योगदान असल्याने या पुलाला त्यांचे नाव द्यावे, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. संत भोजाजी महाराज देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त असून यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा येथून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ भाविकांसाठी दत्ता मेघे फाऊंडेशनच्यावतीने मोफत राहण्याची सुविधा व अन्नछत्र सुरु करण्यासाठी दत्ता मेघे फाऊंडेशन सोबत चर्चा केली असून त्याला प्रतिसाद मिळाला आहे. जागा उपलब्ध झाल्यास लवकरच अन्नछत्र व राहण्याची सुविधा निर्माण करून देणार आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांनी एआयच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट गुगलच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरु करून स्मार्ट शहरासोबत स्मार्ट शेती करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना केले. जलसंवर्धनाची कामे करून धावणाऱ्या पाण्याला थांबायला सांगा, थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरविल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बारामाही शेती करणे सोयीचे होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही नितीन गडकरी म्हणाले.
यावेळी आ. समीर कुणावार म्हणाले, आजनसरा येथे विदर्भातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दररोज हजारो भाविक येथे पुरणपोळीचा प्रसाद करीत असतात. भाविक कुटुंबासह महाप्रसाद बनविण्यासाठी येथे येत असल्याने महाप्रसाद योजनेसाठी या धार्मिक स्थळाला मंजुरी द्यावी. हिंगणघाट तालुक्यात केंद्रीय महामार्ग निधीमधून बरीच कामे झाली असून सिरजगाव-आजनसरा-पोहणा रस्ता बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नितीन गडकरी यांच्याकडे केली. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते यवतमाळ आणि वर्धा दरम्यान आजनसरा येथील वर्धा नदीवरील पुलाचे कुदळ मारून भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.