सिंधी समाजाच्या संघर्षामुळे समाजातील कुटुंबाला मिळाला जागेचा मालकी हक्क : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, सिंधी विस्थापित व अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

वर्धा (जिमाका) : गेल्या अनेक वर्षांपासून विस्थापित असलेल्या सिंधी समाजातील कुटुंबांना स्वतःचे घर होते. मात्र जागेची मालकी नसल्यामुळे मोठी अडचण होती. समाज बांधवांनी यासाठी संघर्ष करून शासनाकडे मालकी हक्क मिळावे यासाठी प्रयत्न केले. राज्य शासनाने कायदेशीर पूर्तता करून सिंधी समाज बांधवांना जागेच्या मालकी हक्क देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या समाजाला न्याय मिळाला असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान टप्पा १ अंतर्गत सिंधी विस्थापित व अतिक्रमीत असलेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटप व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, संजय गांधी निराधार योजना समिती ग्रामीणचे अध्यक्ष आशिष कुचेवार, शहरचे सौरभ देशमुख आदी उपस्थित होते.

दयाल नगर येथील कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ४२ सिंधी बांधवांना पट्टे वाटप करण्यात आले असून उर्वरीत प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येईल. गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा शहरातील नागरिकांच्या जमिनी फ्री होल्ड करून राज्य शासनाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकरण निकाली काढले आहे. तशा प्रकारचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. जमिनीचे मालकी हक्क देण्यात आले असल्याचे यावेळी डॉ. पंकज भोयर म्हणाले.

राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करीत असून शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ७०० रुपये अर्थसहाय्य देण्यात येत होते. शासनाने मोठा निर्णय घेऊन ७०० रुपयावरून १ हजार ५०० रुपये अर्थसहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे पुढे बोलताना डॉ. पंकज भोयर म्हणाले. यावेळी पालकमंत्री भोयर यांच्या हस्ते सिंधी समाजातील ४२, अतिक्रमीत असलेल्या ५२ लाभार्थ्यांना जागेचे पट्टे व संजय गांधी निराधार योजनेच्या १६ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार संदीप पुंडेकर यांनी केले. संचालन रेणुका रोटकर यांनी केले. कार्यक्रमाला सेलूच्या तहसिलदार शंकुतला पाराजे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसिलदार राम कांबळे, श्री दाबेराव, ग्रामसेवक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *