जिल्हाधिकारी वान्मती सी यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचनातीन दिवसीय जनगणना प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन
वर्धा (जिमाका) : जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नियोजनासाठी जनगणनेचा संकलित डेटा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी वान्मती सी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणना २०२७ अनुषंगाने तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जनगणना संचालनालयाचे संयुक्त संचालक कविता गोडबोले, सांख्यिकी अधिकारी प्रणय कडुकर तसेच जिल्हा समन्वयक मुकेश गोंडाणे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तहसीलदार व मुख्याधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी आर्वी विश्वास शिरसाठ, उपविभागीय अधिकारी हिंगणघाट आकाश अवतारे, अधीक्षक अनिकेत सोनवणे, नायब तहसीलदार धनंजय वाघ, सहायक महसूल अधिकारी अमोल उगेवार, महसूल सहायक नितीन मडावी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले की, जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व गणना तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाईल. १६ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करतील. यापूर्वी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध असणार असून, मोबाईलच्या माध्यमातून संकेतस्थळावर माहिती भरता येणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या या जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
यावेळी जनगणना संचालनालयाचे संयुक्त संचालक कविता गोडबोले, सांख्यिकी अधिकारी प्रणय कडुकर तसेच जिल्हा समन्वयक मुकेश गोंडाणे यांनी जनगणनेची पार्श्वभूमी, प्रक्रिया व संकल्पना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जनगणना प्रक्रियेचा पाया, अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका, तसेच पहिल्या टप्प्यातील घरयादी व ३४ मुद्द्यांवरील माहिती संकलन याबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण १८ प्रभारी अधिकारी सहभागी झाले होते. त्यात ८ तहसीलदार व ९ मुख्याधिकारी तसेच १८ स्तरीय लिपीक व १८ टेक्नीकल असिस्टंट यांचा समावेश होता.