वर्धा (जिमाका) : आयुष्मान भारत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्याकडे योजनेचे कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आयुष्मान कार्डची संख्या वाढविण्याची गरज आहे. यासाठी प्रभागनिहाय शिबिराचे आयोजन करावे. तसेच राशन दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्रमार्फत कार्ड काढण्यासाठी जनजागृती करावी, अशा सुचना आयुष्मान भारत महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या अंमलबजावणी आढावा घेण्यात आला, यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकीला आमदार समीर कुणावर, जिल्हाधिकारी वानथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, आयुष्मान भारत योजना राबविण्यात येत असलेल्या सर्व शासकीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी तसेच खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आता सर्वच प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार उपलब्ध करून दिले जातात. योजनेत २ हजार ३९१ प्रकारचे गंभीर आजार व शस्त्रक्रियांच्या समावेश करण्यात आला आहे. सोबतच शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना सुट्टी झाल्यानंतर १० दिवसाच्या मोफत औषधोपचाराचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
आयुष्मान कार्ड काढण्यासाठी रेशनकार्ड आधार लिंक करून १२ अंकी नोंदणी क्रमांक मिळविणे आवश्यक असून यासाठी पुरवठा विभागाचा मोठा सहभाग आवश्यक आहे. पुरवठा विभागाने जास्तीत जास्त राशन आधार लिंक करून घ्यावे, जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २४१ नागरिकांचे उद्दिष्ट असून ६ लाख ५० हजार १४२ नागरिकांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे. केवळ ५.३ टक्के नागरिकांनी आधार प्रमाणीकरण केल्यामुळे आधार प्रमाणीकरण वाढविण्याची गरज असल्याचे डॉ.ओमप्रकाश शेटे म्हणाले.
नागरिकांना घरबसल्या काढता येणार आयुष्मान ‘भारत कार्ड’ केंद्र शासनाने नागरिकांना घरबसल्या आयुष्मान ‘भारत कार्ड काढण्यासाठी आयुष्मान सारथी अपविकसित केला असून ३२९०८२३८३८ या व्हाट्सॲप चॅटबॉटवर संदेश पाठवून योजनेच्या माहितीसह आयुष्मान भारत कार्ड काढता येणार आहे. तसेच नागरिकांना काही तक्रार नोंदवायची असल्यास १८००२३३२२०० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. सोबतच नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्र, संबंधित सर्व शासकीय रुग्णालय व आयुष्मान भारत योजनेंतर्गत समावेश असलेला खाजगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ५ हजार १४५ विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी प्रकरणे प्राप्त झाली असून ४ हजार १० प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी १ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले असून यापैकी ७६ लाख रुपये संबंधित रुग्णालयाला वितरीत करण्यात आले आहे, तसेच ११ खाजगी रुग्णालयामार्फत ११ हजार ७९८ प्रकरणे प्राप्त झाली असून ९ हजार ५७९ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी ४२ कोटी २९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून संबंधित खाजगी रुग्णालयांना २७ कोटी १९ लाख रुपयांचे वितरण करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
आयुष्मान भारत कार्ड वितरणसाठी ४० दिवसाचा कार्यक्रम घ्या : समीर कुणावर
आयुष्मान भारत योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये. प्रत्येकाकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे यासाठी प्रशासन स्तरावर ४० दिवसाचा कार्यक्रम हाती घेऊन गावपातळीपर्यंत योजनेची जनजागृती करावी व प्रभाग निहाय शिबिराचे आयोजन करून आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, अशा सुचना आमदार समीर कुणावर यांनी दिल्या.